स्वमालकीच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी एलआयसी इच्छुक  pudhari photo
मुंबई

LIC redevelopment cess buildings : स्वमालकीच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी एलआयसी इच्छुक

मुंबई शहरात एलआयसीच्या मालकीच्या एकूण 68 उपकरप्राप्त इमारती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वमालकीच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याची तयारी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) दर्शवली आहे. मुंबई शहरातील एलआयसीच्या मालकीच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली.

मुंबई शहरात एलआयसीच्या मालकीच्या एकूण 68 उपकरप्राप्त इमारती असून त्या फोर्ट, गिरगाव, माटुंगा व दादर परिसरात स्थित आहेत. या इमारतींमध्ये मोठ्या संख्येने निवासी व अनिवासी भाडेकरू वास्तव्यास असून अनेक इमारती अत्यंत जुन्या व धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत.

रहिवाशांच्या जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी या इमारतींचा पुनर्विकास होणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत एलआयसीच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान संबंधित इमारतींची सद्यस्थिती, भाडेकरूंच्या पुनर्वसनाची आवश्यकता, पुनर्विकास प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तसेच पुढील टप्प्यातील नियोजन यावर विचारविनिमय करण्यात आला. पुनर्विकास प्रक्रियेत रहिवाशांच्या हिताला प्राधान्य देत सुरक्षित, आधुनिक आणि शाश्वत निवास व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ हे स्वतःच्या इमारती पुनर्विकसित करण्यास इच्छुक असल्याचे एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. तसेच या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन म्हाडा उपाध्यक्षांनी दिले आहे.

एलआयसीच्या फोर्ट येथे 39 इमारती, गिरगाव येथे 18, माटुंगा येथे 3 व दादर येथे 8 इमारती अशा एकूण 68 इमारती आहेत. या 68 इमारतींमध्ये एकूण 815 निवासी व 949 अनिवासी असे एकूण 1 हजार 764 भाडेकरू सद्यस्थितीत वास्तव्यास आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT