मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, ही मागणी राज्य सरकारने नुकतीच मंजुर केल्यानंतर आता भटक्या विमुक्त जमातींनासुध्दा अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करा, या मागणीसाठी भटके विमुक्त जमात आक्रमक झाली आहे. यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे.
भटक्या विमुक्त जमाती या गेल्या ५० वर्षापासून तीन पिढ्या अनुसुचित जातीमध्ये टाकण्यासाठी संघर्ष करत आहेत, मात्र सरकारकडून वेळोवेळी अन्याय केला जात आहे. त्यामुळे आता मराठा समाजाकरिता आरक्षणासाठी सरकारने काढलेला जीआर आणि हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेवून भटक्या विमुक्त जातींना आदिवासींमध्ये समाविष्ट करा, अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याविरोधात त्यांनी बुधवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे.
यावेळी उपराकार माने म्हणाले की, राज्यात भटक्या आणि विमुक्त जमाती या मुळच्या १४ जमाती गुन्हेगार जमाती व २८ भटक्या जमाती अशा एकूण ४२ जमाती असून त्यांची सुमारे २ कोटी लोकसंख्या आहे. यामुळे आता आपल्याला मागे हटायचे नाही, आता जे काही करायचे आहे, ते पुढे जावून करावे लागेल. जरांगेसाठी मुख्यमंत्री पायघड्या घालून पळत होते. आतापर्यंत सरकार घटना दुरूस्ती करावी लागेल म्हणत होते, मग आता हैद्राबादचे गॅझेट कसे काढले. असा सवाल उपस्थित करत माने यांनी आम्हालाही हैद्राबाद गॅझेटमधून आरक्षण द्या, अशी मागणी केली.
५० वर्षांपासून आम्ही लढत आहोत, आमच्या तीन पिढ्या लढल्या, मात्र हे सरकार गरिबांचे नाही. मोठ्या जातीसाठी ते वाकले. आमच्याकडेही गॅझेट आहेत, ते ही बाहेर काढा, आम्ही ५० वर्षांपासून लढा देत आहोत, तरीही सरकार आमचे ऐकत नाही. आपला तो बाब्या, लोकांचा मात्र कारट्या, या म्हणीप्रमाणे आमच्यासोबत वागत आहे. आता यापुढे हा भेदभाव सहन करायचा नाही, आता संधी मिळाली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. सामुदायिक उपोषण सुरु ठेवून, जे करायचे ते सर्वांनी मिळून करायचे, असे आवाहन माने यांनी उपस्थितांना केले.
आम्ही आंबेडकरवादी नेते आहोत, आमचे ऐकले नाही, तर तुमची वाट कशी बंद करायची हे आम्हाला चांगले माहिती, आम्ही तुमची घरे दिवस - रात्री फोडलेली आहेत, आम्ही गुन्हेगारी लोक आहोत. ब्रिटिशालाही घाम फोडलेले आहोत, यामुळे आमच्या वाटेला तुम्ही गेल्यास तर तुमची काही खैर नाही, असा इशारा लक्ष्मण माने यांनी सरकारला दिला.
उपोषणाआधीचं पोलीसांच्या अटी घातल्या आहेत यामध्ये केवळ २०० खुर्च्यांची मंजुरी दिली असून प्रत्येकांला आधार कार्ड अनिवार्य केले आहे तसेच दररोज परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे. केवळ दोन दिवसांची उपोषणाची परवानगी दिली आहे.
मागण्या :-
१) हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेवून भटक्या विमुक्त जातींना आदिवासींमध्ये समाविष्ट करा.
२) आदिवासींचा दर्जा द्या, घटनेचे संरक्षण द्या.
३) स्वतंत्र बजेट करा, सबप्लान तयार करा.
३) आताच्या आदिवासींना 'अ' म्हणा आणि आम्हाला 'ब' म्हणा.
४) भटक्या विमुक्त जमाती 'अ' व 'ब' यांना ओबीसीच्या यादीतून वगळण्यात यावे.