Lalbaugcha Raja Short Circuit Video Pudhari
मुंबई

Lalbaugcha Raja Video: लालबाग राजाच्या मंडपात शॉर्ट सर्किट; भाविकांमध्ये भीतीचे वातावरण, VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja Short Circuit Video: मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडपात रविवारी फीडर पिलरमध्ये किरकोळ शॉर्ट सर्किट झाल्याने भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.

Rahul Shelke

Lalbaugcha Raja Short Circuit Video: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडपात रविवारी किरकोळ शॉर्ट सर्किट झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक मंडपात उपस्थित असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

मंडपाच्या छताजवळ ठिणग्या, भाविकांमध्ये भीती

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंडपाच्या छताजवळ अचानक ठिणग्या उडताना दिसत आहेत. सजावटीच्या भागाजवळ काही काळ आगीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था PTI ला दिलेल्या माहितीनुसार, मंडपातील फीडर पिलरमध्ये किरकोळ शॉर्ट सर्किट झाले होते. परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

फीडर पिलर म्हणजे वीज वितरणासाठी वापरले जाणारे एक विद्युत उपकरणांचे कॅबिनेट असते. त्यामध्ये सर्किट ब्रेकर, फ्यूज आणि स्विच यांसारखी उपकरणे असतात.

लालबाग परिसरात काही तासांपूर्वी दोन जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दरम्यान, याच लालबाग परिसरात काही तासांपूर्वी विजेचा धक्का लागून एका आठ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या दुर्घटनेत अन्य चार जण जखमी झाले आहेत.

ही घटना रात्री सुमारे 2.20 वाजता काळाचौकी परिसरातील दत्ताराम लाड मार्गावरील दिग्विजय मिल चाळ येथे घडली. गणेशोत्सवामुळे परिसरात मोठी गर्दी होती.

मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पाण्याच्या आणि शीतपेयांच्या स्टॉलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वीजप्रवाह उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला आणि खबरदारी म्हणून परिसराची नाकेबंदी केली.

विजेचा धक्का बसलेल्या सहा जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आठ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित चार जणांवर उपचार सुरू होते.

जोगेश्वरीतही तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी परिसरातही रविवारी विजेच्या धक्क्याची आणखी एक दुर्घटना घडली. गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या बंद कृत्रिम तलावात प्रवेश करताना १९ वर्षीय कामगाराला विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील विविध गणेश मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वीजपुरवठा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT