PP Margacha Raja Ganeshotsav: मुस्लिम कुटुंबाकडून सलग १७ वर्षे गणरायाची मनोभावे सेवा; मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील ‘पी. पी. मार्गाचा राजा’

अब्बास खान कुटुंबाकडून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
PP Margacha Raja Ganeshotsav
PP Margacha Raja GaneshotsavPudhari
Published on
Updated on

मुंबई: धर्माच्या सीमा ओलांडून भक्ती, माणुसकी आणि बंधुभावाचा संदेश देणारे अनोखे उदाहरण कामाठीपुरा परिसरात पाहायला मिळत आहे. ए. पी. कॉलेजजवळील पी. पी. मार्गावर विराजमान होणाऱ्या ‘पी. पी. मार्गाचा राजा’ गणरायाची मुस्लिम समाजातील अब्बास दिलावर खान आणि त्यांचे कुटुंब गेल्या १७ वर्षांपासून मनोभावे सेवा करीत आहेत.

गणेशमूर्ती आणण्यापासून मंडप उभारणी, सजावट, आरती, हार-फुले आणि प्रसादाची व्यवस्था अशा विविध कामांमध्ये खान कुटुंबाचा सक्रिय सहभाग असतो.

कामाठीपुरा परिसरातील पी. पी. मार्गावर बालगोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळातर्फे १९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. २००९ मध्ये मंडळाचे कार्यकर्ते शिर्डीला जात असताना झालेल्या अपघातात तत्कालीन अध्यक्षांसह सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी अब्बास खान यांनी मंडळाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. तेव्हापासून ते गणरायाच्या सेवेत कार्यरत आहेत.

PP Margacha Raja Ganeshotsav
UPSC Engineering Jobs: अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून ४८० पदांसाठी होणार भरती; ६ ऑक्टोबर अंतिम मुदत

गणेशोत्सव जवळ आला की परिसरातील मुस्लिम बांधवांकडून अब्बास खान यांना ‘गणपती कधी आणणार?’ अशी दरवर्षी आवर्जून विचारणा होते. मंडप उभारणी, सजावट, जनरेटरची व्यवस्था, गणपती आणणे, आरती व हार-फुलांची तयारी अशा कामांमध्ये मुस्लिम समाजातील अनेक जण आपला उत्सव समजून सहभागी होतात. अब्बास खान यांचा मुलगा साहिलही गणरायाची आरती म्हणण्यापासून प्रत्येक सेवा कार्यात आई वडिलांना मदत करताना दिसतो.

खान कुटुंबाच्या घरीही तयार होतो प्रसाद

गणेशोत्सवातील प्रसादाची तयारी खान कुटुंबाच्या घरीही केली जाते. अब्बास खान यांच्या पत्नी हसीना खान शिरा आणि उकडलेले चणे तयार करून मंडपात नेतात. त्यामुळे गणरायाचा उत्सव हा केवळ एका समाजापुरता मर्यादित न राहता परिसरातील सर्वांचा उत्सव बनल्याचे चित्र आहे.

‘बाप्पाची सेवा करताना हिंदू-मुस्लिम असा भेद जाणवत नाही. एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन प्रेमाने राहणे हाच खरा धर्म आहे,’ असे मुलगा साहिल खान यांनी सांगितले.

PP Margacha Raja Ganeshotsav
CKP Hall Auction शिवाजी पार्कमधील सीकेपी हॉल लिलावाच्या वाटेवर; साडेआठ कोटींचे कर्ज थकल्याने बँकेची नोटीस

यंदा २७ फूट उंच गणरायाची मूर्ती

यंदा ‘पी. पी. मार्गाचा राजा’ची २७ फूट उंच गणेशमूर्ती आहे. मंडळाच्या गणेशोत्सवासाठी स्थानिक रहिवाशांकडून सक्तीने वर्गणी घेतली जात नाही. स्वखुशीने देणाऱ्यांची देणगी स्वीकारली जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या गणरायाची ओळख निर्माण झाल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीतही मुस्लिम बांधव सहभागी होतात. गणरायाला निरोप देताना ते गुलाल उधळत मिरवणुकीत सहभागी होतात. धार्मिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाचे हे चित्र गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेते.

१७ वर्षांची गणरायाची सेवा

  • १९६३ पासून पी. पी. मार्गावर गणेशोत्सव

  • २००९ पासून अब्बास खान यांचा सहभाग

  • खान कुटुंबाची १७ वर्षांपासून सेवा

  • यंदा २७ फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना

  • गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांचा सहभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news