मुंबई : गिरणगाव आणि मध्यमवर्गीय मराठीबहुल लोकसंख्या असणाऱ्या परळ आणि लालबाग या भागांमध्ये सुरुवातीपासूनच शिवसेना उबाठाचे वर्चस्व आहे. या निवडणुकीतही ते अबाधित असल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईतील प्रभाग 204 मध्ये उमेदवारी न दिल्याने नाराज असणाऱ्या माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी पक्षाशी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि मनपा निवडणुकीसाठी उमेदवारीसुद्धा मिळवली. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. मात्र लालबाग-परळकरांनी ठाकरेंची साथ सोडली नाही, हेच निकालाने सिद्ध केले, कारण, मतदारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडणाऱ्या कोकीळ यांना दणका दिला.
मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाचे उमेदवार किरण तावडे यांनी कोकीळ यांना पराभूत केले. या प्रभागातून काँग्रेसचे नरेंद्र अवधूतसुद्धा रिंगणात होते. मात्र खरी लढत ही कोकीळ आणि तावडे यांच्यातच होती. अखेर लालबागमध्ये फक्त ठाकरेच, हे मतदारांनी सिद्ध केले.
नारायण राणेंपासून ते अगदी शिंदेंपर्यंत ठाकरेंच्या पक्षात झालेली बंडाळीसुद्धा लालबाग-परळचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नाते तोडू शकली नाही. यावेळीसुद्धा कोकीळ यांचे बंड इथे अपवाद ठरले नाही. बंडखोरीची दृष्ट लागलेल्या लालबागमधीत मतदार आणि कट्टर शिवसैनिकांनी हा गड खऱ्या अर्थाने राखला.