मुंबई: खातेदारांच्या मुदतठेवी तारण ठेवून त्यावर ४१ लाखांचे कर्ज काढून त्यातील २५ लाखांचा अपहार बँकेच्याच कारकुनाने केल्याचा प्रकार जी. एस सहकारी बँकेच्या लालबाग शाखेत उघडकीस आला आहे.
कनिष्ठ लिपिक-लेखापाल ज्ञानेश्वर रामचंद्र घोगरे याच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने आपल्या पदाचा गैरवापर करुन ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार कांदिवली येथे राहत असून जी. एस. सहकारी बँकेत वरिष्ठ शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात. या बँकेच्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सत्तरहून अधिक शाखा आहेत. फेब्रुवारी २०१८ साली या बँकेत ज्ञानेश्वर हा प्रशिक्षणार्थी लिपिक म्हणून लागला होता. मार्च २०२४ साली त्याला कनिष्ठ लिपिक म्हणून बढती मिळाली आणि नंतर त्याच्यावर लेखापाल म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.
खातेदाराने दिलेले धनादेश चेक त्यांच्या खात्यात जमा करणे, नवीन डिपॉझिट घेणे, नवीन खाती उघडणे व बंद करणे, मुदत संपलेले डिपॉझिट नूतनीकरण करणे, कर्ज खाते, गोल्ड लोन आदी कामे त्याच्यावर सोपविण्यात आली होती. बॅकेत अनेक खातेदारांच्या मुदतठेवी असून त्या ठेवींचे संगणक प्रणालीमध्ये आपोआप नूतनीकरण होते. त्यासाठी खातेदारांना बँकेत यावे लागत नाही. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानेश्वरने बँक बंद होण्यापूवी चार मुदतठेवी तारण ठेवून त्याद्वारे २४ लाख २७ हजार ७३५ रुपयांची रक्कम काढल्याचे लालबागच्या शाखेतील रोखपालाच्या लक्षात आली.
ज्ञानेश्वरने आपल्या पदाचा गैरवापर करुन खातेदारांच्या मुदत ठेवीवर परस्पर कर्ज करुन ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी हा प्रकार बँकेच्या ऑडिटरला कळवला. त्यांनी बँकेच्या व्यवहारांची चौकशी केल्यानंतर ज्ञानेश्वरने गेल्या काही वर्षांत सहा खातेदारांच्या ठेवीवर ४१ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज काढल्याचे उघडकीस आले. ही रक्कम त्याच्यासह त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.
त्याने शाखेतील इतर कर्मचाऱ्यांना कोणतेही लेखी कागदपत्रे सादर न करता, कर्जाची रजिस्टरमध्ये नोंद न करता ४१ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज काढून या कर्जापैकी २५ लाख ७३ हजार ५६७ रुपयांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अहवाल सादर केल्यानंतर त्याला गेल्या फेब्रुवारीमध्ये बँकेतून निलंबित करण्यात आले.