मुंबई : गुरूवारी रात्री 8:38 च्या सुमारास कुर्ला यार्डात कुर्ला आणि विद्याविहार स्टेशन दरम्याच्या रुळांवर उभा कचरा वाहू रेल्वेचा डब्बा (मक स्पेशल रेक) अचानक पेटला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या मंदगती मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ ठप्प झाली.
आगीचा प्रकार समजतास अग्णिशमन पथके कुर्ला यार्डात धावली. तो पर्यंत कचरा गाडीची आग चांगलीच भडकली होती. ती नियंत्रणात येण्यास रात्रीचे 9 वाजले. अधिकऱ्यांनी सांगितले की या आगीत विशेष कचरावाहू रेल्वेचा एक डब्बा भस्मसात झाला. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. रुळांवर उभ्या रेल्वेमध्ये केवळ कचरा होता आणि तो आणखी पेट घेण्याची भीती होती. आग नियंत्रणात येईपर्यंत 1 डब्बा खाक झाला.
खबरदारीचा उपाय म्हणून आणि अग्निशमन दलाला जागा मिळावी म्हणून सायन आणि विद्याविहार स्थानका दरम्यान ओव्हर हेड वायरचा वीजपूरवठाही थांबवण्यात आला होता. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी मंदगती मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली.
दक्षिण मुंबईकडे जाणारे प्रवासी त्यामुळे अडकून पडले. तब्बल अर्धा पाऊण तास त्यांना लोकलची वाट पहावी लागली. रात्री 8.30 वाजता ठप्प झालेली लोकल वाहतूक पुर्ववत होण्यास रात्रीचे 9.15 वाजले. यादरम्यान अन्य मार्गावरील वाहतूक पुर्ववत सुरू होती.
कचरा रेल्वे उभी होती ती जागा सार्वजनिक वर्दळीची नसतांनाही ही आग का लागली हे स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध घेत जात असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या रेल्वेला ही आग लागली ती रेल्वे रेल्वेरुळाच्यामध्ये साठलेला कचरा जमा करते आणि वाहून नेते. ही रेल्वे रुळावर उभी असताना एका डब्याला आग कशी लागली हे स्पष्ट झाले नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी सांगितले.