मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील दुबार मतदारांच्या छाननीमध्ये कुर्ल्यात सर्वाधिक 16 हजार 532 दुबार मतदार आढळून आले आहेत. अंधेरी पश्चिमेला 12 हजार 10 तर कांदिवलीमध्ये 11 हजार 668 दुबार मतदार सापडले आहेत. मोहम्मद अली रोड, पायधुनी, भेंडी बाजार, डोंगरी आदी भागात सर्वात कमी म्हणजे अवघे 1 हजार 76 दुबार मतदार सापडले.
मुंबई शहरातील 227 प्रभागातील दुबार मतदारांना शोधण्यात मुंबई महापालिकेला मोठे यश आले आहे. निवडणूक आयोगाने 11 लाख 1 हजार 516 दुबार नावे काढली होती. परंतु मुंबई महानगरपालिकेने गेल्या महिन्याभरापासून दुबार नावे शोधण्यासाठी राबवलेल्या मोहिमेमुळे प्रत्यक्षात दुबार नावे समोर आली आहेत.
निवडणूक आयोगाने एकच नाव असलेल्या अनेक मतदारांनाही दुबार नावांमध्ये टाकले होते. अशी नावे वगळून पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय दुबार मतदारांना शोधून काढले. यात सर्वाधिक 16,532 मतदार पालिकेच्या कुर्ला एल विभागात सापडले. अन्य विभागात ही संख्या 1,076 ते 12,010 इतकी आहे. या सर्व दुबार मतदारांना त्यांनी सुचवलेल्या शहरातील एकाच मतदार केंद्रावर मतदान करता येणार आहे. अन्य मतदारसंघात त्यांचे नाव असले तरी, मतदानाचा हक्क राहणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
दुबार मतदार शोध मोहिमेमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 1 लाख 28 हजार 808 घरांना भेटी दिल्या. यातील 48 हजार 628 दुबार मतदारांनी परिशिष्ट एक भरून आपण एका ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र दिले. मात्र 78 हजार 105 जणांपैकी काही जणांनी परिशिष्ट एक भरून देण्यास नकार दिला तर, काही दुबार मतदार त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे दिसून आले. परंतु अशा मतदारांना एकदाच मतदान करता येणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
पालिका विभाग कार्यालयाच्या आकडेवारनुसार दुबार मतदार
फोर्ट ए विभाग - 2421
डोंगरी बी विभाग- 1076
चंदनवाडी सी विभाग - 1575
ग्रँड रोड डी विभाग- 5252
भायखळा ई विभाग- 3568
माटुंगा एफ उत्तर- 5,860
परळ एफ दक्षिण- 4,437
दादर जी उत्तर- 5,909
प्रभादेवी जी दक्षिण- 6,198
सांताक्रुझ एच पूर्व- 6,672
बांद्रा एच पश्चिम-3,760
अंधेरी के पूर्व- 2,556
जोगेश्वरी के उत्तर- 2,762
अंधेरी के पश्चिम - 12,010
कुर्ला एल विभाग-16,532
गोवंडी एम पूर्व - 7863
चेंबूर एम पश्चिम - 5,206
घाटकोपर एन विभाग -8,012
मालाड पी पूर्व -3,680
मालाड पी उत्तर- 7,626
गोरेगाव पी दक्षिण- 7,964
बोरिवली आर मध्य- 8,805
दहिसर आर उत्तर- 4,984
कांदिवली आर दक्षिण- 11,618
भांडुप एस विभाग- 9,078
मुलुंड टी विभाग - 3,344