

नवी दिल्ली : अमेरिकेच्या व्हिसा नियमांमध्ये झालेल्या अचानक बदलांमुळे शेकडो भारतीय व्यावसायिक सध्या संकटात सापडले आहेत. अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाने डिसेंबर महिन्यात होणाऱ्या एच-1 बी व्हिसा स्टॅम्पिंगच्या मुलाखती अचानक रद्द करून त्या सहा महिने पुढे ढकलल्या आहेत. या अनपेक्षित निर्णयामुळे जे भारतीय सुट्टीसाठी किंवा व्हिसा स्टॅम्पिंगसाठी भारतात आले होते, त्यांना आता अमेरिकेत परत जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे तेथे खरेदी केलेल्या घराचे मोटारीचे करायचे काय, असा सवाल ते उपस्थित करत आहेत.
या गोंधळात एका भारतीय नागरिकाने रेडिटवर विचारलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमेरिकेत माझे स्वतःचे घर आणि गाडी आहे. पण आता व्हिसाअभावी मी तिथे कधी परतू शकेन याची खात्री नाही. अशा स्थितीत या मालमत्तेचे काय करायचे, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली असून जे लोक गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेत आहेत, त्यांच्यासाठी भाड्याने राहणे परवडणारे नसल्याने त्यांनी तिथे घरे खरेदी केली आहेत. आता ही मालमत्ता भाड्याने द्यायची की विकायची, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
सोशल मीडिया तपासणीमुळे विलंब
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 15 डिसेंबरपासून व्हिसा अर्जदारांच्या सोशल मीडिया प्रोफाईलची सखोल तपासणी करण्याचे नवीन धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दूतावासांवरील कामाचा ताण वाढला असून, जानेवारीतील मुलाखती थेट नोव्हेंबर-डिसेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देत नाहीत, अशा भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची टांगती तलवार आता निर्माण झाली आहे.
1) अमेरिकन दूतावासाने एच-1बी व्हिसा मुलाखती 6 महिने ते एक वर्षपर्यंत पुढे ढकलल्या.
2) सोशल मीडिया तपासणीच्या नवीन नियमामुळे प्रक्रियेला विलंब.
3) भारतात अडकलेल्या भारतीयांना आता घर आणि गाडी विकण्यासाठी पॉवर ऑफ ॲटर्नीचा आधार घ्यावा लागत आहे.
4) भारत सरकारने हा विषय अमेरिकन प्रशासनाकडे गांभीर्याने मांडला असून लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.