

मुंबईः मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू असतानाच विधानसभेत परस्परांच्या विरोधात उभे राहिलेले पवार काका-पुतणे एकत्र येणार काय, या चर्चेने जोर धरला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी महायुतीविरोधात एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. तुतारी चिन्हावर लढा, या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अटीमुळे ही चर्चा संपली. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप चर्चा सुरू असून त्यातच पुन्हा एकदा बारामतीत पवार कुटुंबीय एका मंचावर येत आहेत.
शरद पवार सेंटर फॉर नॉलेज एक्सलन्स या इमारतीचे बारामतीत अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या उपस्थितीत उदघाट्न होत आहे. या कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच अजित दादा पवार आणि सुनेत्रा पवार असे दोन्हीकडचे दोघेही हजर राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवर छापले गेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अदानी यांच्या उपस्थितीत काका-पुतणे एकत्र येण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. पवार यांच्या 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पूर्वी दहा डिसेंबरला दिल्लीत झालेल्या भोजन प्रसंगालाही दोघेही एकत्र आले होते. पुन्हा एकदा या सततच्या गाठीभेटीमुळे पवार कुटुंबात ऐक्यपर्व सुरू होत आहे काय, ठाकरे कुटुंबाप्रमाणेच ते राजकारणात एकत्र येणार का, अशा चर्चेने जोर धरला आहे.
ताई केंद्रात मंत्री?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राज्यसभेतील निवृत्तीनंतर त्यांचे वेगळे झालेले पुतणे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राज्यातील पक्षाचे काम पाहतील, तर त्यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीतील आघाडी सांभाळत एनडीए सरकारचा भाग होतील, अशी बातमी आज एका इंग्रजी वर्तमानपत्राने छापली. त्यामुळे फार पूर्वी ठरलेला समन्वयाचा फॉर्म्युला पवार कुटुंबीय प्रत्यक्षात आणणार का, असेही सुरू झाले. अदानी यांनी ही मोहीम उघडल्याचेही समाजमाध्यमांवर चर्चेत असते. त्यातच पुणे येथे महायुतीला आव्हान देण्यासाठी दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या होत्या.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांनी पुण्यातील निवडणूक तुतारी चिन्हावर लढवावी, अशी भूमिका घेतल्यामुळे ही एकी प्रत्यक्षात येण्यापूर्वीच भंग पावली. पिंपरी-चिंचवडमध्येही नेमके काय सुरू आहे, स्वतःची ताकद वाढवण्यासाठी महापालिकेत वेगळे लढण्याचा निर्णय आधीच झाला होता, मात्र कोल्हापूर तसेच पुणे येथे अजित पवार यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे कारण काय, अशी विचारणाही होते आहे. केंद्रातील सत्तेत सामील होण्यासाठी पवार पिता-पुत्रीशी वेगळ्या माध्यमातून चर्चा होईल, ते माध्यम अजितदादा नसेल, असेही मानले जाते आहे. मात्र दोन्ही गटांनी या सर्व तथ्यहीन चर्चा असल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.