kunbi caste certificate Pudhari
मुंबई

Maratha Kunbi Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढायचे, कोणती कागदपत्रे लागणार?; पुरावा मिळवण्याचे पर्याय वाचा

kunbi maratha caste certificate documents: अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला

पुढारी वृत्तसेवा

Kunbi Maratha How To Apply List Of Documents In Marathi

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली. त्यातील नोंदीनुसार आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र कसे आणि कुठे काढायचे, त्याला कोणती कागदपत्रे लागणार, याची सविस्तर माहिती वाचा...

कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा www.aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. हा अर्ज तहसील कार्यालयात जाईल. योग्य कागदपत्रे जोडली असल्यास उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील. त्यासाठी कमीत कमी 21 ते 45 दिवस लागू शकतात.

कुणबी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट (दोन्हींवर जन्मतारीख व जन्मस्थान) यांचा उल्लेख आवश्यक आहे.

  • ओळखीचा पुरावा (कोणताही एक) अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत आवश्यक आहे.

  • पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) अर्जदाराचे रेशन कार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, 7/12 किंवा 8 अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत आवश्यक आहे.

  • जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहीत नमुन्यातील अर्ज व त्यावर 10 रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो.

  • 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे.

कुणबी पुरावा मिळवण्याचे इतर पर्याय

स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. 14 मध्ये प्रत्येकाच्या जन्म-मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जात होत्या. मात्र, 1 डिसेंबर 1963 पासून कोतवालाचे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले.

  • सर्वप्रथम आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते ते तपासावे.

  • त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकाचे नाव असणार्‍या गाव नमुना नं. 14 ची किंवा कोतवाल बुकची नक्कल मागणी करावी. नक्कल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे का, ते तपासावे.

  • आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (6 ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, 7/12 उतारे, 8 अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सात-बारा अमलात येण्याआधी असणारे क.ड.ई. पत्र, सोडपत्र, खासरापत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे का, ते शोधावे.

  • वरील पैकी एका ठिकाणी जर कुणबी नोंद आढळली, तर त्या कागदपत्राची प्रत काढून घ्यावी. छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रेदेखील कुणबी असल्याचा पुरावा ग्राह्य धरला जाईल.

कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा?

कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो. त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या 13 ऑक्टोबर 1967 किंवा या दिनांकाच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे...

तुमचे वडील / चुलते / आत्या / आजोबा / पणजोबा / खापर पणजोबा / वडिलांचे चुलते किंवा आत्या / आजोबांचे चुलते किंवा आत्या / पणजोबांचे चुलते किंवा आत्या / खापरपणजोबांचे चुलते किंवा आत्या/ तुमच्या वाडवडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ-बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ काढता येते अशी भावकी इत्यादी.

अर्जाचा मोठा प्रवास

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पूर्वजांचा जातीचा महसुली पुरावा हवा असतो. तो नसल्यास रक्तनात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा आवश्यक आहे. अर्जासोबत शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीआधारे शपथपत्र द्यावे लागेल. पूर्वजांच्या जातींच्या नोंदी, वंशावळ जुळवणारे शपथपत्र, जात पुरावा, टीसीसह सर्व कागदपत्रे घेऊन महाऑनलाईनवर अर्ज करावा लागेल. त्या अर्जाची तहसील कार्यालयात छाननी होऊन त्रुटी असल्यास कळवल्या जातील. अन्यथा हा अर्ज ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी जाईल. ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायानंतर अर्ज उपविभागीय अधिकार्‍यांकडे जाईल आणि तेच अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT