Kranti Ganeshotsav Mandal Pudhari
मुंबई

Kranti Ganeshotsav Mandal: 'कोलडोंगरीचा विघ्नहर्ता' च्या देखाव्यात मीनाक्षी देवीचे दर्शन

क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारतातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अमन विधाते यांच्या संकल्पनेतील देखावा आणि मितेश डिंगणकर यांनी साकारलेली बाप्पाची मूर्ती आकर्षण ठरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: क्रांती गणेशोत्सव मंडळ त्याच्या भव्य, मनमोहक आणि रुबाबदार मूर्तीसाठी ओळखला जाते. यंदा युवा मूर्तिकार मितेश डिंगणकर यांनी बाप्पाची सुबक मूर्ती साकारली आहे. हे मंडळ ऐतिहासिक, पौराणिक तसेच सामाजिक संदेश देणारे भव्य देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे नामवंत कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून भारतातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी सांगितले की, तमिळनाडूतील मदुराई येथे असलेले मीनाक्षी मंदिर हे एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. इच्छा असुनही अनेकांना या मंदिराला भेट देता येत नाही. त्यामुळे गणेशभक्तांसाठी मीनाक्षी मंदिराचा देखावा तयार करण्याचे मंडळाने ठरविले. देखाव्याची संपूर्ण संकल्पना माझी आहे.

मूळ दक्षिण भारतीय मंदिराचा फील देण्यासाठी जवळपास २५ ते ३० कारागीर दोन महिन्यांहून अधिक काळ यासाठी मेहनत घेत होते. हे मंदिर दक्षिण भारतीय 'द्रविड वास्तुकला' शैलीचे सर्वात उत्कृष्ट आणि परिपूर्ण उदाहरण मानले जाते.

मंदिराची परिपूर्णता देखाव्यात येण्यासाठी आम्ही चांगले नियोजन केले होते. देखावा पर्यावरणपूरक कसा होईल, त्याला आम्ही प्राधान्य दिले. मुंबईत राहून दक्षिण भारतातील पवित्र मंदिराचा अनुभव देणारा हा देखावा भाविकांसाठी आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे मंडळातर्फे यंदा १४ ते ३० सप्टेंबर असे १६ दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंडळाने यंदा 'माझा लाडका लाडका लाडका कोलडोंगरीचा विघ्नहर्ता' हे गाणे लाँच केले आहे.

अमोल कदम गीतकार असून शिरीष पवार गायक आहेत. शिरीष पवार यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना चिटणीस राजाभाऊ ठाणगे यांनी दिली.

असा साकारला देखावा

  • देखाव्याच्या ६० बाय ६० आकाराच्या मंडपात हे मंदिर साकारण्यात आले असून सभामंडप पूर्णतः वातानुकूलित आहे.

  • या देखाव्याची लांबी, ६० फूट, रुंदी ४५ फूट आणि उंची ७५ फूट आहे. एकूण दहा खांबांवरती देखावा उभा राहिला आहे.

  • देखाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे,श्री विष्णूंचे साकारलेले दशावतार. मीनाक्षी देवीची मूर्तीही देखाव्यात पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT