Koyna Dam water to Mumbai
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोयना जलविद्युत प्रकल्पातून समुद्रात जाणारे पाणी मुंबईला वळवण्याबाबतची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत झाली, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर मुंबईकरांसाठी तब्बल ६७ टीएमसी नवा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
गिरीश महाजन यांनी सांगितले की, जलबोगदे व पाईपलाईनच्या माध्यमातून मुंबईकडे पाणी वळवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. वीजनिर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी जलबोगदे व पाईपलाईनच्या माध्यमातून मुंबईकडे वळवण्याबाबत चर्चा झाली.
मुंबई व महानगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांच्या पाण्याचे नियोजन सरकार करत आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या व नवीन प्रकल्पांसह कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर चर्चा झाली.
चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी वाशिष्ठी नदीत सोडून दिले जाते. या पाणीसाठ्याच्या वरील भागात कुठलाही प्रकल्प किंवा एमआयडीसी नसल्यामुळे कोयना धरणात येणारे पाणी हे महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते.
वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाया जाणारे पाणी भुयारी बोगदे आणि पाईपलाईनच्या माध्यमातून मुंबईपर्यंत आणता येऊ शकेल का, याबाबत उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना तब्बल ६७ टीएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.