Railway Pudhari
मुंबई

Konkan Railway Marathi language: अखेर कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर मराठी भाषेला मिळाले चौथे स्थान!

रेल्वे प्रशासनाच्या बदलानंतर कोकणवासीय समाधानी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कोकण रेल्वेच्या वेबसाईटमध्ये मराठी भाषेला १४ वे स्थान देण्यात आले होते. याबाबत दैनिक पुढारीमध्ये बातमी प्रसिद्ध होताच, मराठी माणसाने विशेषत: कोकणवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला वेबसाईटमध्ये मराठी भाषेला चौथे स्थान देणे भाग पडले.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसह कोकण रेल्वेबाबत प्रवाशांना माहिती व्हावी, यासाठी कोकण रेल्वेने वेबसाईट सुरू केली आहे. यात सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.

परंतु वेबसाईटवर भाषा निवडण्याची जेथे उपलब्धता केली आहे. तेथे क्लिक केल्यावर सुरुवातीला इंग्रजी व त्यानंतर हिंदी भाषेचा पर्याय येतो. त्या खालोखाल आसामी, बंगाली, बडो, डोंगरी, गोवा कोकणी, गुजराती, कानडा, कश्मिरी, मैथिली, मल्याळम मनिपुर या भाषेनंतर मराठी भाषेचा पर्याय देण्यात आला होता.

याबाबत १८ ऑक्टोबरला दैनिक पुढारीमध्ये बातमी प्रसिद्ध झाली. मराठी माणसासह कोकणवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या बातमीची दखल घेत कोकण रेल्वेने आपल्या वेबसाईटमध्ये बदल करून मराठी भाषेला चौथे स्थान दिले आहे. पहिल्या स्थानी इंग्रजी भाषा असून दुसऱ्या स्थानी हिंदी तिसऱ्या स्थानी गोव्यातील कोंकणी भाषेचा समावेश आहे.

त्यामुळे मराठी भाषेचे महत्व लक्षात घेऊन कोकण रेल्वेने केलेल्या बदलाबद्दल कोकणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र मराठी भाषेला किमान दुसरे स्थान मिळावे, असे मतही व्यक्त केले.

कोंकणी भाषेला तिसरे स्थान का ?

कोकण रेल्वे कोकणातून धावत असून हा मार्ग ३७५ किमी इतका आहे. त्यामुळे या रेल्वेने सर्वाधिक मराठी माणसे प्रवास करतात. तरीही ११० किमी मार्ग असलेल्या गोव्याच्या कोंकणी भाषेला मराठी भाषेपेक्षा उच्च स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या आधारावर कोकणी भाषेला तिसरे स्थान देण्यात आले, असा सवाल कोकणवासीयांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT