

मुंबई: मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे व पाडकामे बंद ठेवण्यात यावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे.
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली असून मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे. २०१७-१८ पासून मुंबईतील पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत सुमारे ४८ टक्क्यांनी घट झाली आहे.
मात्र, प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता आहे. बांधकामस्थळांवर सेन्सर आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, लाकूड किंवा कोळशाचा वापर करणाऱ्या बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनावर रूपांतर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
मुंबईसाठी स्वतंत्र श्रेणीबद्ध कृती आराखडा तयार करून पूर्वनिश्चित उपाययोजना लागू करण्याची व्यवस्था असावी. प्रदूषणग्रस्त भाग व प्रमुख वाहतूक मार्गांवर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून रस्ते धुणे व पाण्याची फवारणी करणे, रात्री यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे, खड्डे खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे वेळेत पूर्ण करणे, यावरही त्यांनी शेलार यांनी पत्रात भर दिला आहे.