मुंबई : अपहरणासह दरोड्याच्या गुन्ह्यात एका महिलेस सहाजणांना एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. तारक मैत्री, रघुनाथ मैत्री, दिपक महाडिक, अलका महाडिक, राहुल दिवे आणि सुनिल गोराई अशी या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 77 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. व्यावसायिक वादातून तक्रारदार व्यापाऱ्याचे अपहार करून हा दरोडा घालण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहाही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक करून हा मुद्देमाल जप्त केला.
यातील तक्रारदारांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे काळबादेवी परिसरात एक युनिट आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ते ओल्ड हनुमान गल्लीजवळील त्यांच्या घराजवळ उभे होते. यावेळी चारजणांच्या एका टोळीने त्यांचे अपहरण करून परळ येथील एका फ्लॅटमध्ये आणले. त्यात एका महिलेचाही समावेश होता.
तिथे त्यांना तारक आणि रघुनाथ यांनी जुन्या व्यावसायिक वादातून बेदम मारहाण केली. त्यांना 76 लाख 23 हजार 900 रुपयांचे 591 सोन्याचे दागिने, ऑनलाईन पंधरा हजार आणि 2 लाख 99 हजार रुपयांचा धनादेश असा 79 लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल देण्यास भाग पाडले आणि नंतर त्यांची सुटका केली. घरी आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपींना वेगवेगळ्या परिसरांतून अटक
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या पथकाने वेगवेगळ्या परिसरांतून तारक मैत्री, रघुनाथ मैत्री, दिपक महाडिक, अलका महाडिक, राहुल दिवे आणि सुनिल गोराई या सहाजणांना अटक केली. अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 75 लाख रुपयांचे 591 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 लाख 35 हजार 500 रुपयांची कॅश असा 77 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.