

कोपरखैरणे : नवी मुंबई एमआयडीसीत आगाच्या दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी रात्री रबाळे एमआयडीसीतील जेल फार्मा ही कंपनी आगीत भस्मसात झाली. रात्री दोन वाजता लागलेल्या आगीवर सोळा तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलास यश मिळाले आहे. कंपनीत रसायनांचा साठा असल्याने आगीने भीषण रुप घेतले होते. आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
रबाळे एमआयडीसीतील आर 952 भूखंडावरील जेल फार्मा ही कंपनी आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या कंपनीत मेणा वापरून उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वालाग्रही रासायनिक पदार्थांचा साठा होतो. यामुळे आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच पावणे रबाळे एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. मात्र आगीची भीषणता पाहता नवी मुंबई मनपाच्या वाशी, कोपरखैरणे, ऐरोली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. कंपनी एक मजली इमारतीत असली तरी आगीचा भडका पाहता जवळून आग विझवणे शक्य नव्हते. त्यामुळे उंच इमारतीवरून ग्रान्टो गाडीचा वापर करीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आग विझली तरी पुन्हा-पुन्हा भडकत होती. त्यामुळे आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री दोन ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत अथक प्रयत्न करावे लागले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.