Dr Sejal Pawar Controversy pudhari photo
मुंबई

Dr. Sejal Pawar Controversy : डॉ. सेजल पवारचा माफीनामा

आक्षेपार्ह वक्तव्यांवरून वाद; पालकांना बोलावून समुपदेशन, शिस्तभंग कारवाईचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कॉमेडी शोमधील वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या केईएम रुग्णालयातील एमबीबीएस विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे. चौकशी अहवालात तिची काही विधाने आक्षेपार्ह, असंवेदनशील आणि वैद्यकीय विद्यार्थ्याकडून अपेक्षित असलेल्या व्यावसायिक आचारसंहितेशी विसंगत असल्याचे सांगण्यात आले आहे.

केईएम प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने संबंधित व्हिडीओची पाहणी करून विद्यार्थिनीशी संवाद साधला आणि प्राथमिक अहवाल सादर केला. दरम्यान, डॉ. पवार हिने लेखी माफी मागितली असून तिच्या काही वक्तव्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याची कबुली दिली आहे.

प्रशासनाने तिच्या पालकांना १३ जून रोजी संस्थेत उपस्थित राहण्यास सांगितले असून त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात येणार आहे. केईएम प्रशासनाने लागू नियमांनुसार पुढील शिस्तभंग कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थिनीची उपस्थिती, क्लिनिकल प्रशिक्षण आणि इतर संबंधित बाबींची स्वतंत्र चौकशी सुरू असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच संबंधित व्हिडीओ किंवा त्याचा भाग पुढे प्रसारित न करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार हिला तंबी देऊन तिच्या बदलीचा विचार करावा, अशी मागणी महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT