Arvind sawant on konkan railway | कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

माजी केंद्रीय मंत्री खा. अरविंद सावंत यांची संसदेत मागणी
Arvind sawant on konkan railway
Arvind sawant on konkan railway
Published on
Updated on

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना सिंगल ट्रॅकमुळे सात तास उशीर होतो. त्याचा नाहक त्रास कोकणातील प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तातडीने करा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, मुंबईचे खासदार, सिंधुदुर्गचे सुपुत्र अरविंद सावंत यांनी सोमवारी संसदेत केली.

खा. अरविंद सावंत म्हणाले, सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना कोकणच्या ४० कि. मी. मार्गाचे दुपदरीकरण झाले होते. त्यानंतर हे काम थांबले आहे. प्रा. मधु दंडवते यांनी रेल्वेमंत्री असताना त्यांनी या मार्गाचे स्वप्न पूर्णत्वाला नेले. आज या रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग असून या मार्गाचे दुपदरीकरण व्हावे अशी आग्रही मागणी संसदेत खा. अरविंद सावंत यांनी केली.

सभागृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ही उपस्थित होते. खा. सावंत यांच्या मागणीवर उत्तर देताना ना. वैष्णव म्हणाले, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सरकारच्या विचाराधीन आहे. हा मार्ग तयार करताना पाच राज्यांच्या सहभाग घेण्यात आला होता. त्यातील दोन राज्यांनी भारतीय रेल्वेत कोकण रेल्वे विलीनीकरण करण्याच्या मुद्द्याला मान्यता दिली आहे. आता उर्वरित तीन राज्यांची मान्यता घेतली जाईल व विलीनीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल असे स्पष्ट केले.

कोकण रेल्वेबरोबरच मुंबई लोकल रेल्वेचा मुद्दाही खा. अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. सरकार बुलेट ट्रेन आणि हायस्पीड कॉरिडॉरच्या गप्पा मारत असताना सामान्य प्रवाशांच्या पदरात काय पडते? असा सवाल केला. रेल्वे मंत्रालयाच्या सन २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ठाकरे शिवसेनेचे नेते खा. अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही मुंबईकरांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. जोपर्यंत ४ मार्गांचे ६ मार्गांमध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत लोकल सेवेचा बोजवारा उडालेलाच राहील. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना त्यांनी सुचवलेल्या एलिव्हेटेड ट्रेन प्रकल्पावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या प्रचंड विलंबाने धावत असून सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होत नाही आणि संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण होत नाही, तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. आज बुलेट ट्रेनपेक्षा कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरमधील सफाळे येथे बुलेट ट्रेनच्या टनेलसाठी होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. कंत्राटदारांकडून मिळणारी तुटपुंजी मदत पुरेशी नसून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळावी, ही मागणी त्यांनी लावून धरली.

मग 'सीएसटी'वर छत्रपतींचा पुतळा का नाही?

केवडिया स्टेशनवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवला जाऊ शकतो, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा बसवण्यास प्रशासन नीतीचे कारण पुढे करून का नकार देत आहे? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचे बॅनर सत्ताधारी पक्षाने लावले होते, मात्र प्रत्यक्षात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड यांसारख्या स्थानकांची नावे अद्यापही बदलली गेलेली नाहीत. ह्यासंदर्भात प्रत्यक्ष कृती कधी करणार? असा प्रश्न त्यांनी, मुंबई सेंट्रल स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबई लोकलचे मोटरमन मानसिक तणावाखाली!

मुंबईतील लोकलचे मोटरमन मानसिक तणावाखाली असून मोठ्या संख्येने राजीनामे देत आहेत. त्यांच्या केबिनमधील आवाजाची समस्या व कामाचे तास यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच रेल्वे ट्रॅकची सुरक्षा राखणाऱ्या गँगमन व खलाशी यांच्या समस्यांकडेही दुर्लक्ष करू नका, अशी सूचना त्यांनी केली. रेल्वे मंत्री स्वतः प्रशासकीय अधिकारी राहिले आहेत, त्यांनी राजकीय चष्म्यातून न पाहता प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून महाराष्ट्राच्या या न्याय मागण्या पूर्ण कराव्यात, असे खा. अरविंद सावंत यांनी संसदेत सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news