मुंबई : दुखापत झालेल्या खेळाडूंसाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग सुरू करण्यात आला आहे. स्पोर्ट्स इन्जुरी ॲन्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचा लोकार्पण सोहळा आयुक्त भूषण गगराणी यांच्याहस्ते रविवारी पार पडला. दुखापतग्रस्त खेळाडूंना एकाच छताखाली अत्याधुनिक उपचार व पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देणारे केईएम रुग्णालय हे मुंबईतील पहिले शासकीय रुग्णालय ठरणार आहे.
गगराणी म्हणाले, देशात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी सुरू असताना, मुंबईसारख्या महानगरात क्रीडापटूंसाठी असे केंद्र उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या केंद्रातून उपचार घेऊन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना याचा मोठा फायदा होईल. सामाजिक बांधिलकीतून बालकृष्ण इंडस्ट्रीने दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे ही अत्याधुनिक सुविधा उभी राहू शकली.
या क्रीडा वैद्यकीय विभागामुळे केईएम रुग्णालयाची देशपातळीवरील प्रतिष्ठा अधिक उंचावेल, असा विश्वासही गगराणी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. मोहन देसाई, बालकृष्ण इंडस्ट्रीच्या विजयालक्ष्मी पोद्दार व अरविंद पोद्दार आदी उपस्थित होते.