

प्रकाश साबळे
मुंबई : मुंबई महापालिकेत उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गातून मुलाखतीद्वारे निवड झालेल्या पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर 5 सहाय्यक आयुक्तांची लवकरच नेमणूक होणार आहे. या संवर्गातील पदासाठी एकूण 12 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांची निवड झाल्याने त्यांची मुलाखत पार पडली.
मुंबई महापालिकेत डिसेंबरमध्ये तीन सहाय्यक आयुक्तांची उपायुक्त संवर्गातील पदावर पदोन्नती होणार आहे. यामुळे सदर विभागातील सहाय्यक आयुक्त पद रिक्त होणार आहे. यासाठी पालिका प्रशासकांनी उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गातून पूर्णकालिक तत्वावर सहाय्यक आयुक्त नियुक्तीचा निर्णय घेतला होता. यासाठी 17 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात काढली होती. या जाहिरातीनुसार महापालिका प्रशासनाकडे एकूण 12 उमेदवारांचे अर्ज आले होते. यापैकी एक उमेदवार बाद झाला, तर 2 जणांनी इच्छा नसल्याने अर्ज माघारी घेतले. आणि 4 अभियंत्यांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्याने त्यांना सदर पदाची संधी नाकारण्यात आली. यानंतर उर्वरित 5 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यांची झाली निराशा
पूर्णकालिक तत्वावर पुन्हा सहाय्यक आयुक्तांना संधी मिळेल, या आशेने प्रभारी सहाय्यक आयुक्तही मैदानात उतरले होते. यामध्ये पी.दक्षिण, आर.दक्षिण, आर.उत्तर आणि इतर विभाग कार्यालयांतील तत्कालीन आणि विद्यमान प्रभारी सहाय्यक आयुक्तांची निराशा झाली.
या विभागात होऊ शकते नियुक्ती
निवड झालेल्या 5 सहाय्यक आयुक्तांची पालिका डी विभाग, जी.उत्तर, आर.उत्तर, मालमत्ता, एन, एस विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन आदी विभागांत नेमणूक होऊ शकते.
एक महिन्यानंतर घेतल्या मुलाखती
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या कामकाजामुळे अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी व्यस्त असल्याने पूर्णकालिक तत्वावरील सहाय्यक आयुक्त संवर्गातील पदासाठीच्या मुलाखती महिनाभर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या 14 डिसेंबरला पार पडल्या. 5 उमेदवारांच्या नियुक्त्या बाकी आहेत.