प्रतीकात्मक छायाचित्र. File Photo.
मुंबई

Shivsena Symbol Case: ब्रिटनमध्ये आठ वर्षांत सात PM, तरीही पक्षात फूट पडली नाही; शिवसेनाप्रकरणी न्यायमूर्तींचे निरीक्षण

गुरुवारी पुन्‍हा होणार पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena symbol case

शिवाजी काळे, पुढारी वृत्तसेवा : खरोखरच पक्षातील एका गटाच्‍या वैचारिक किंवा मानसिकतेमध्‍ये बदल झाला होता, तर २०१९ च्या निवडणुकीपासून २०२२ किंवा २०२३ पर्यंत कोणीतरी नाराजी व्यक्त करणारे एखादे तरी विधान करायला हवे होते. त्या संपूर्ण वर्षांमध्ये एकानेही एकही विधान केले नाही. ते सरकारमध्ये मंत्री होते. आणि मग अचानक ते म्हणतात की ते नाराज आहेत आणि सर्व काही त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात चालले आहे, असा युक्‍तीवाद शिवसेना ठाकरे गटाच्‍य वतीने ज्‍येष्‍ठ वकील कपिल सिब्‍बल यांनी आज सर्वोच्‍च न्‍यायालयात केला. यावर राजकीय पक्षाचे सातत्य किंवा स्थिरता ही लोकशाहीच्या परिपक्वतेवर अवलंबून असते... उदाहरणार्थ, ब्रिटिश संसदेत आठ वर्षांत सात पंतप्रधान झाले. परंतु तेथील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी एकाही पक्षात कधीही फूट पडली नाही, असे निरीक्षण सरन्‍यायाधीश सूर्य कांत यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडपीठातील न्‍यायमूर्ती बागची यांनी नोंदवले

इतर बहुतांश लोकशाही देशांमध्‍ये असे घडत नाही : सिब्‍बल

आजच्‍या युक्‍तीवादावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्‍हणाले, मी हेही सांगू इच्छितो की संसदीय लोकशाहीचे सर्वात मोठे नुकसान हे अंधाधुंद किंवा विनाकारण काढल्या जाणाऱ्या व्हीपमुळे (Whips) झाले आहे. आज जवळपास प्रत्येक विधिमंडळ कामकाजासाठी व्हीप जारी केला जातो. तुम्ही व्हीपचे पालन केले नाही, तर तुम्हाला अपात्रतेला सामोरे जावे लागते. याचा परिणाम असा होतो की वैयक्तिक आमदाराला/खासदाराला कोणतेही स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य उरत नाही. इतर बहुतांश लोकशाही देशांमध्ये असे घडत नाही.इंग्लंडमध्‍ये कायदा संमत करून घेण्यासाठी कंझर्व्हेटिव्ह पार्टी लेबर पार्टीच्या सदस्यांशी संपर्क साधते. अमेरिकेत रिपब्लिकन डेमोक्रॅट्सची समजूत काढतात आणि डेमोक्रॅट्स रिपब्लिकनची समजूत काढतात. तिथे असा व्हीप नसतो. तिथे अपात्रतेची कारवाई नसते. याच (व्हीपच्या) व्यवस्थेने आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे नुकसान केले आहे, असा दावाही सिब्‍बल यांनी केला.

लोकशाहीच्या भविष्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्‍न

"आपल्या लोकशाहीच्या भविष्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रातिनिधिक लोकशाहीच्या चौकटीत अशा प्रकारचे कृत्य किंवा कारवाई मुळी परवानगी देण्यायोग्य आहे का, याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. तिथे सर्व काही घडवून आणण्यात आले होते. कोणताही (वैध) निर्णय झालेला नव्हता. आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेवर याचे अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत. आता ही पद्धत सर्वत्र सर्रास वापरली जात आहे. लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय आता तुम्हालाच घ्यावा लागेल," असा युक्‍तीवाद ठाकरे गटाच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ वकील कपिल सिब्‍बल यांनी केला.

दोन परस्परविरोधी गटाशी विधिमंडळ पक्षाशी काहीही संबंध नाही

सर्वोच्‍च न्‍यायालयात आज सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडीपाठसमोर शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी ठाकरे गटाच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना कपिल सिब्‍बल म्‍हणाले की, एका राजकीय पक्षात दोन परस्परविरोधी गट किंवा घटक आहेत. याचा विधिमंडळ पक्षाशी काहीही संबंध नाही. जेव्हा राजकीय पक्षातील दोन विरोधी गट स्वतःलाच खरा पक्ष असल्याचा दावा करतात, तेव्हा निवडणूक आयोग पक्ष संघटनेच्या कामकाजाची आणि कागदपत्रांची तपासणी करतो आणि कोणता गट मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे हे ठरवतो. (निवडणूक चिन्ह आदेशाच्या) परिच्छेद १५ चा मूळ पायाच राजकीय पक्षातील वाद हा आहे. मग अशा वेळी विधिमंडळ पक्षाला यात मध्ये कसे आणले जाऊ शकते?, असा सवालही त्‍यांनी केला.

निवडणूक आयोगाने ते आदेश कसे दिले?

राजकीय पक्षात कोणताही विरोधी गट अस्तित्वात नव्हता. तरीही, निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना पक्ष संघटनात्मक आणि विधिमंडळ अशा दोन्ही घटकांशी संबंधित कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले.त्यानंतर, १९ जुलै रोजी दाखल केलेल्या याचिकेत उल्लेख केलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६ जुलै २०२२ रोजी पार पडली.उत्तर प्रतिज्ञापत्रासोबत सादर केलेल्या त्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार (Minutes), या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे होते आणि त्याला शिवसेनेचे दोन नेते तसेच ७७ उपनेते उपस्थित होते. त्या बैठकीत पक्षाच्या २०१८ च्या घटनेत दुरुस्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांना ठाऊक होते की २०१८ ची घटना अस्तित्वात होती. त्या सर्वांची नियुक्ती २०१८ च्या घटनेनुसारच झाली होती. त्यांनी २०१८ च्या घटनेनुसारच काम केले होते. सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी पाऊल उचलले आणि त्यानंतर त्यांनी स्वतः २०१८ च्या घटनेत दुरुस्ती केली.पक्ष २०१८ च्या घटनेनुसारच चालत होता हे दोन्ही बाजूंनी मान्य केले असतानाही, निवडणूक आयोग म्हणतो, "ही घटना माझ्यासमोर उपलब्ध नाही, त्यामुळे मी ती पाहणार नाही."

पक्षाची घटना तपासण्‍याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुठे आहे?

परिच्छेद १५ अंतर्गत पक्षाची घटना लोकशाही मार्गाची आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुठे आहे? पक्षाची घटना वैध आहे की लोकशाहीवादी आहे, हे ठरवण्याचा अधिकार परिच्छेद १५ अंतर्गत निवडणूक आयोगाला अजिबात दिलेला नाही. तो त्यांच्या अधिकारक्षेत्राचा भागच नाही.तरीही, २०१८ च्या घटनेचा विचार करायचा नाही, तर मग आम्ही जिथे प्रचंड बहुमतात होतो. त्या पक्ष संघटनेच्या रचनेचीही तपासणी करायची नाही, अशा निष्कर्षावर निवडणूक आयोग आला. त्याऐवजी त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळावर हा वाद सोडवला, जे 'सादिक अली' प्रकरणातील निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात आहे, असेही सिब्‍बल यांनी स्‍पष्‍ट केले. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (दि. ६) दुपारी २ वाजता पुन्हा सुरू होणार आहे.

पक्षांतरबंदी कायद्यातील १० व्या अनुसूचीचा गैरवापरच

सरन्‍यायाधीश सूर्य कांत म्‍हणाले की, पक्षांतरबंदी कायद्यातील १० व्या अनुसूचीद्वारे पक्षंतरबंदी प्रकार/गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामागे एक विशिष्ट उद्देश होता. यावर सिब्‍बल यांनी स्‍पष्‍ट केले की, "अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे की त्याचा उपयोग झालेला नाही. उलट, १० व्या अनुसूचीमुळे विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा चांगल्या वापराऐवजी गैरवापरच अधिक झाला आहे. आज आपण जो परिणाम पाहत आहोत तोच आहे.समजा एखाद्या राजकीय पक्षाच्या आमदारांचा एक गट, केवळ ते बहुमतात आहेत म्हणून, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हटवण्यासाठी ठराव मंजूर करतो आणि त्या अनुषंगाने काही पूर्वनियोजित कृत्ये करतो. ते राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवू शकत नाहीत. त्यांची ती कृत्ये म्हणजेच पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडून देणे ठरते."

एक बेकायदेशीर सरकार काम करत राहिले

शेवटी, सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा दाद मागावी लागल्यानंतर २०२४ मध्ये अपात्रतेचा निर्णय झाला. परिणामी, एक प्रकारची सक्तीची परिस्थिती निर्माण झाली. एक बेकायदेशीर सरकार काम करत राहिले आणि या मुद्द्यावर कोणताही निर्णय झाला नाही. मला इतकेच सांगायचे आहे की, याचे आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेवर अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत, अशी भीतीही सिब्‍बल यांनी व्‍यक्‍त केली.

विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचेच नियंत्रण : न्‍या. बागची

न्यायमूर्ती जोयमाल्य बागची: विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचेच नियंत्रण असते. राजकीय पक्षाचा कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरला पाहिजे. यावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्‍हणाले, अगदी बरोबर. कायदा हाच आहे; पण आता काहीतरी नवीन घडत आहे, आणि हे केवळ या एका प्रकरणापुरते मर्यादित नाही. पक्षांतराचा एक पूर्णपणे नवा टप्पा सुरू झाला आहे. आता काय होते की, विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षाला बाजूला ठेवून थेट दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होतो. एका चिन्हावर निवडणूक लढवल्यानंतर, त्याचे सदस्य दुसऱ्या चिन्हावर दुसऱ्याच राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करू लागतात.

चिन्ह राजकीय पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचे?

चिन्ह राजकीय पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचे? असा सवाल न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांनी केला. यावर सिब्बल म्‍हणाले, पक्षाचे चिन्‍ह हे पक्षाचे असते... निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो. यावर सरन्‍यायधीश सूर्य कांत यांनी स्‍पष्‍ट केले की, चिन्ह उमेदवाराला वाटप केले जाते. तर न्यायमूर्ती बागची: राजकीय पक्षातील बहुमताचा अर्थ काय? आणि आमदारांच्या बाबतीत? असा सवाल केला. यावर सिब्‍बल म्‍हणाले, राजकीय पक्षाच्या रचनेतील सर्व स्तरांचा विचार केला गेला पाहिजे. न्यायमूर्ती बागची म्‍हणाले, मग पुढचा प्रश्न येतो. पक्षाची घटना ठरवेल की पक्षाची रचना कशी असेल आणि त्या पक्षातील बहुमत कसे निश्चित केले जाईल. यावर सिब्‍बल म्‍हणाले, इथे निवडणूक आयोग म्हणतो की त्यांच्याकडे पक्षाची घटनाच उपलब्ध नाही. दोन्ही बाजूंनी हीच पक्षाची रचना आहे आणि ते प्रतिनिधी सभेचे सदस्य आहेत हे मान्य करूनही. जर घटनाच अस्तित्वात नव्हती, तर २०१४ च्या निवडणुका चुकीच्या होत्या, २०१८ च्या निवडणुका चुकीच्या होत्या आणि सरकार स्वतःच बेकायदेशीर होते. जर पक्ष आपल्या घटनेनुसार काम करत नसेल, तर निवडणूक आयोगाने त्याची मान्यता रद्द करणे आवश्यक होते.

बहुमत कसे ठरवायचे याचा फॉर्म्युला असणे आवश्यक : सरन्‍यायाधीश

सरन्यायाधीश सूर्य कांत स्‍पष्‍ट केले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, पक्षाच्या घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये बहुमत कसे ठरवायचे याचा काहीतरी फॉर्म्युला असणे आवश्यक आहे. अन्यथा, एक बाजू म्हणेल की निवडून आलेले प्रतिनिधी त्यांच्यासोबत आहेत, तर दुसरी बाजू म्हणेल की पक्षात कार्यकर्ते, प्राथमिक सदस्य, पदाधिकारी आणि इतर घटकांचा समावेश आहे. हे कसे निश्चित केले जाईल?, असा सवालही त्‍यांनी केला.

पक्षप्रमुखांचे अधिकार अन् पक्षाची घटना यावरून जोरदार युक्तिवाद

कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाच्या अधिकारांचे आणि शिवसेनेच्या घटनेचे समर्थन केले. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ३१ आमदार भाजपशासित राज्यात गेले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावून शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आणि अजय चौधरी यांची नवी नियुक्ती केली. या निर्णयावर न्यायाधीशांनी आमदारांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल विचारणा केली असता, सिब्बल यांनी स्पष्ट केले की सुभाष देसाई प्रकरणाच्या निकालाचा दाखला देताना पक्षप्रमुखांनाच हकालपट्टीचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे; त्यामुळे आमदारांच्या स्वतंत्र स्वाक्षऱ्यांची गरज नाही.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ठाकरे गटाने कडक शब्दांत आक्षेप घेतला. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंकडेच पक्षाची सूत्रे होती आणि २०१३ व २०१८ मधील पक्षाच्या घटनेनुसारच सर्व अधिकृत नियुक्त्या झाल्या होत्या. निवडणूक आयोगाने "पक्षाची घटना नोंदीवर नाही" असे सांगून त्यावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. २०१९ ते २०२२ या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते, तेव्हा या घटनेवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाला पक्षाची घटना वैध की अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT