मुंबई : कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे परिसरातील राहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनासह सरकारला फटकारले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने या परिसरातील दूषित वातावरण, दुर्गंधीचे निराकरण करण्यासाठी समिती नेमूनही दुर्गंधी मात्र जैसे थे आहे. त्यामुळे पालिका प्रशासन काय करते, असा संतप्त सवाल केला. त्यानंतर लखनौ येथील कचराभूमीचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे सरकारला आदेश दिले.
कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पर्यावरणवादी कार्यकर्ते दयानंद स्टॅलियन यांच्या वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने ॲड. झमान अली यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. तर विक्रोळी कन्नमवार नगर येथील रहिवाशांनी ॲड अभिजित राणे यांच्या मार्फत रिट याचिका दाखल केली आहे. डम्पिंगमुळे दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असून यावर प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ॲड. राणे यांनी कांजूर डम्पिंगचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.
दुर्गधी कायम आहे. याकडे न्यायालायचे लक्ष वेधले. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समितीत स्थानिक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने समितीत स्थानिक व्यक्तीची नेमणूक करण्याचे सरकारला आदेश द्यावेत अशी विनंती केली.
याची दखल घेत खंडपीठाने देवनार डम्पिंग ग्राऊंडसाठी काम करणाऱ्या राज शर्मा यांची निवड या समितीत करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. तसेच उत्तरप्रदेशच्या लखनौ येथील कचरा डेपोची पाहणी करण्यासाठी समितीला उत्तर प्रदेश येथे दौरा करण्याचे व त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
22 डिसेंबर रोजी झालेल्या न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने महापालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले होते. तुम्ही, जनतेला गृहित धरू नका. स्वच्छ आणि निरोगी हवेत श्वास घेणे हा लोकांचा मुलभूत अधिकार आहे, हे ध्यानात ठेवा. ग्राऊंडवरील दुर्गंधीचा लहान मुलांनाही त्रास होत असल्याने या समस्येकरता तक्रार निवारणासाठी अहोरात्र हेल्पलाईन सुरू करा. जर ते जर तुम्हाला नसेल तर आम्हाला कठोर निर्देश द्यावे लागतील, असा इशारा दिला होता.
मुंबईत दररोज सहा ते सात टन कचरा निर्माण होतो. यातील पाच टन कचरा कांजूरमार्ग डंपिंगवर टाकला जातो. याची दुर्गंधी विक्रोळी, भांडुप, नाहूर, मुलुंड आदी भागांतील नागरिकांना होत आहे. नवी मुंबईपर्यंतही ही दुर्गंधी येते. तसेच रेल्वे व रस्ते प्रवाशांनाही याचा त्रासह सहन करावा लागतो.