

नेवाळी : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाऱ्हेण गावच्या हद्दीतील क्रांती साईड परिसरात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काम वाटपाच्या वादातून लाठी, दांडके आणि रॉड घेऊन जमलेल्या टोळीने गावकऱ्यांवर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी झालेल्या रक्तरंजित राड्यात जखमी झालेल्या आकाश गजानन म्हात्रे यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दुपारी ते आणि त्यांच्या गावातील इतर काही लोक महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील जेलच्या बांधकामासाठी साहित्य व काम वाटपाबाबतची बैठक असल्याने क्रांती कंपनीच्या कार्यालयात गेले होते. समोरचे लोक न आल्याने बराच वेळ थांबून ते कार्यालयाबाहेर आले असता, सागर तवले व त्याच्यासह दहापेक्षा अधिक साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाठी, दांडके आणि लोखंडी रॉड घेऊन तेथे वाट पाहत उभे असल्याचे दिसले.
फिर्यादी आकाश म्हात्रे यांना सागर तवले याने सांगितले कि, “तुला इथे कोणतेही काम मिळणार नाही, तू इथून निघून जा” अशी धमकी दिल्यानंतर अचानक टोळीने फिर्यादीसोबत असलेल्या लोकांना बेदम मारहाण सुरू केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सागर तवलेने प्लास्टिकच्या फावड्याचा धारी असलेला दांडा वापरून आकाश म्हात्रे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार करून गंभीर दुखापत केली.
तसेच, फिर्यादीच्या सोबत असलेल्या व्यक्तींना प्रज्वल तवले, सिद्धांत भंडारी, जय पाटील, रुद्र पावशे, बंदी दाभणे, तेजस वारे, साजन पाटील, आदेश म्हात्रे, दिनेश यादव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी लाठ्या-रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर जखमींना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात तसेच उल्हासनगर व डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हाणामारीचे स्वरूप मोठे आणि सार्वजनिक ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, एैन मलंगगड यात्रेच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
संपूर्ण टोळीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
आरोपी सागर तवले हा ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळे गावात राहणारा आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे येत आहे. आता हिललाईन पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाल्याने, ठाणे पोलीस आयुक्तांच्या कार्यतत्पर कारवाईच्या आदेशांकडे आणि सागर तवलेच्या अटकेकडे परिसरातील नागरिक, जखमींचे नातेवाईक आणि स्थानिकांकडून लक्ष लागले आहे. व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर मुख्य आरोपींसह संपूर्ण टोळीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत असून, “आरोपी मोकाट असतील तर यात्रेदरम्यान तणाव वाढू शकतो,” अशीही चर्चा रंगली आहे.