

उरण ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, 19 जानेवारी 2026 पासून सुरू झालेले आमरण उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम आहे. सिडको प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रकल्पबाधितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जर प्रशासनाने तातडीने चर्चा करून मार्ग काढला नाही, तर उद्या चौथ्या दिवसापासून अधिक प्रकल्पबाधित या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे संघटक किरण केणी आणि प्रविण मुठ्ठेनवार हे सध्या आमरण उपोषणाला बसले आहेत. विमानतळ उभारणीसाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या अनेक न्याय्य मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून शासन आणि सिडको दरबारी प्रलंबित आहेत.
उपोषणाचा तिसरा दिवस असूनही सिडको प्रशासनाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांशी किंवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे प्रकल्पबाधितांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गुरुवारपासून या उपोषणाचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, मोठ्या संख्येने इतर प्रकल्पबाधितही उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे समजते. या आंदोलनामुळे विमानतळ परिसरातील वातावरण तापले असून, आता राज्य सरकार आणि सिडको प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्या
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या: 2019 नंतर निष्कासित (तोडण्यात आलेल्या) झालेल्या घरांच्या मालकांना घरभाडे भत्ता आणि 500 रुपये प्रोत्साहन भत्ता तातडीने देण्यात यावा. सिडकोने शून्य पात्रता ठरवून ज्या प्रकल्पबाधितांची घरे नाकारली आहेत, त्यांना पात्र ठरवून घरे मंजूर करण्यात यावीत. 2013 च्या भूसंपादन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून बाधित मच्छिमारांना योग्य नुकसान भरपाई द्यावी. प्रकल्पांतर्गत निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पबाधितांच्या सुशिक्षित मुलांना प्राधान्याने सामावून घेण्यात यावे.