मुंबई: मागील सुनावणीत कांजूरमार्ग डम्पिंगला टाळे ठोकावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देणाऱ्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला आणखी एक संधी दिली आहे. या डम्पिंगमधून रात्री १ ते पहाटे ६ दरम्यान होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन व प्रदूषण रोखण्यासाठीचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी दिले.
पर्यावरणवादी कार्यकर्ते दयानंद स्टॅलियन यांच्या बनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने अॅड. झमान अली यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. तरविक्रोळी कन्नमवार नगर येथील रहिवाशांनी अॅड. अभिजित राणे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे.
सोमवारी या याचिकांवर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सोसायटीच्या वतीने अॅड. श्रीराम कुलकर्णी आणि अॅड अभिजीत राणे, तसेच वनशक्तीसाठी अॅड जमान अली यांनी युक्तिवाद केला. या प्रदूषणाचा परिणाम केवळ १५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कन्नमवार नगर परिसरावरच नाही, तर विक्रोळी, मुलुंड आणि भांडुप येथील रहिवाशांवर सुद्धा होत आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
त्यावर खंडपीठाने चिंता व्यक्त केली. आम्हाला याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यांचा निश्चितपणे विचार करावाच लागेल. हा सर्व परिसर विकसनशील असून येथे बहुमजली इमारती आहेत आणि दाट लोकवस्तीच्या भागात लाखो नागरिक राहतात. मोठ्या लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.
यावेळी पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. तसेच मिथेन उत्सर्जनाची दखल घेण्यात आली असून, ही बाब संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना कळवण्यात आली आहे. त्यांनी त्याच अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आणि तातडीच्या उपाययोजनांचा विचार करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळही मागितला.
या युक्तिवादानंतर खंडपीठाने सुनावणी ७ मे पर्यंत तहकूब केली डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहेत. मात्र महापालिका आणि सरकारला अजून गांभीर्य समजलेले नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच पर्याय आहे. डम्पिंग ग्राऊंडलाच टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा मागील आठवड्यात दिला होता.