Crime News: टोळक्याकडून तरुणाला मारहाण File Photo
मुंबई

Kandivali Attack: कांदिवलीत तरुणांवर गर्दुल्ले, दारुड्यांचा प्राणघातक हल्ला10 ते 15 गर्दुल्ल्यांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

सोसायट्यांमधील रहिवाशांत प्रचंड दहशतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील वसंत कॉम्प्लेक्स-चिकूवाडीजवळील बीएमसी सीबीएसई शाळेच्या परिसरातील अंशुल हाईट्स सोसायटीच्या आवारात 2 तरुणांवर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टीत राहणाऱ्या गर्दुल्ल्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार गुरुवार दि.12 रोजी रात्री 11.45 च्या सुमारास घडला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण असून महिला व जेष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.

ज्यांच्यावर हल्ला झाला ते गोलू मिश्रा व विशाल यादव हे अंशुल सोसायटीच्या सी विंग मध्ये राहणाऱ्या सौरव यादव या त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी आले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 वाजण्याची वाट बघत ते सोसायटीच्या बाहेर थांबले होते. त्याच वेळेस सोसायटीपासून जवळच असलेल्या झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलाने सिगारेटसाठी त्यांना पैसे मागितले. त्यास नकार देताच तो मुलगा त्यांना अर्वाच्च व अश्लील भाषेत शिव्या देऊ लागला. त्याला जाब विचारताच त्या मुलाचे 10-15 मित्र तिथे गोळा झाले व त्यांनी त्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

एका हल्लेखोराने तरुणांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोघा तरुणांनी कसाबसा प्रतिकार करून हल्लेखोरांना दूर लोटले आणि ते सोसायटीच्या इमारतीत घुसले. तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. ते पाठलाग करत सोसायटीच्या आवारात घुसले. तैनात सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप केला व हल्लेखोरांना पळवून लावले आणि पुढील प्रकार टाळण्यासाठी सोसायटीचे सर्व गेट बंद केले.

झोपडपट्टी हटविण्याची मागणी

या परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या बीएमसी सीबीएसई शाळेच्या परिसरात गर्दुल्ले व दारुड्यांचा नेहमीच धिंगाणा सुरू असतो. अंशुल सोसायटी, वसंत कॉम्प्लेक्स, वृंदावन सोसायटी, ओंकार सोसायटी, कृष्णा सोसायटी येथील नागरिकांना नेहमीच हा त्रास सहन करावा लागतो. बीएमसी, सीबीएसई शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनाही गर्दुल्ले व दारुड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सदर गर्दुल्ले व दारुड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आणि झोपडपट्टी ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT