कांदिवली : कांदिवली पश्चिमेला लिंकरोडवरील दुभाजकांमध्ये लाखो रुपये खर्च करून विविध शोभेची व विशिष्ट जातींची झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. मात्र नंतर या दुभाजकावर बेघर नागरिकांनी बस्तान मांडले आणि आपला संसार थाटला. यामुळे सौंदर्यीकरण लयास जाऊन, दुभाजकाची दुरवस्था झाली. बेघरांच्या दैनंदिन व्यवहारांमुळे वाहन चालकांसह प्रवासी हैराण झाले होते.
याबाबत दै. पुढारीमध्ये 18 नोव्हेंबर रोजी, ‘बेघर नागरिकांचे दुभाजकांमध्ये बस्तान’ या मथाळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी मेट्रो सुरक्षा कर्मचारी आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने बेघरांना हाकलून दिले. दुभाजक बेघरमुक्त केला. यामुळे दुभाजकाने आता मोकळा श्वास घेतला आहे.
लिंक रोडवरून धावणारी प्रशस्त मेट्रो रेल्वे आणि खालील न्यु लिंक मार्गावरील 5 फूट रुंदीच्या दुभाजकांमध्ये लाखो रुपये खर्च करून विशिष्ट प्रजाती आणि विविध रंगांची फुलझाडे लावून सौंदर्यीकरण करण्यात आले होते.हे सौंदर्यीकरण रोज प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक व प्रवाशांना समाधान व आनंद देत होते. मात्र नंतर काही अज्ञात बेघर नागरिकांनी या दुभाजकावर बस्तान मांडले. त्यांच्या दैनंदिन व्यवहारांमुळे शोभेची झाडे, फुलझाडे नष्ट झाली.
सौंदर्य लुप्त पावले. बेघरांनी मांडलेल्या संसारामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली. अज्ञात नागरिकांनी मांडलेल्या बस्तानाचा, दुर्गंधीचा आणि घाणीचा वाहनचालक व प्रवाशांना नाहक सहन करावा लागत होता.यासंदर्भात दै. पुढारीत प्रसिध्द झालेल्या बातमीमुळे दुभाजकामध्ये राहणाऱ्या अज्ञात नागरिकांना हाकलण्यात आले.यामुळे दुभाजकाने मोकळा श्वास घेतला असून वाहन चालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागरिकांकडून आलेल्या तक्रारी तसेच दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मेट्रो परिसरात बस्तान मांडलेल्या बेघर नागरिकांना हाकलून लावले आणि दुभाजक मोकळा केला.यामुळे दैनिक पुढारीचे आभार.विजय मालुसरे, शाखाप्रमुख,उबाठा