कांदिवली : कांदिवली आर दक्षिण महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समतानगरमधील बस डेपोच्या बाजूच्या महानगरपालिकेच्या जॉगर्स पार्क मैदानाची दुरवस्था झाली आहे. या मैदानाच्या संरक्षण भिंतीचे नूतनीकरण नगरसेविका माधुरी भोईर यांच्या उद्यान कक्ष निधीतून 2021-22 मध्ये करण्यात आले होते. परंतु आता या उद्यानाची संरक्षण भिंत ढासळली आहे. मैदानाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या मैदानाची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मैदानात स्थानिक नागरिक, महिला तसेच लहान मुलांना खेळण्याकरिता अडचणी येत आहेत.
जॉगर्स पार्क मैदानाची सुरक्षा भिंत ढासळलेली असून लोखंडी गेट पडलेले आहे. मैदानात लावलेल्या फरशाही उखडल्या आहेत. नागरिकांना बसण्याकरिता ठेवलेले बेंचही मोडकळीस आले आहेत. मैदानातील खेळाचे व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे. जॉगिंग ट्रॅकच्या मार्गावर खड्डे पडले असून ट्रॅक नादुरुस्त झाल्याने जॉगिंगला आलेल्या वरिष्ठ नागरिकांना येथून चालणेही कठीण झाले आहे. जॉगर्स पार्क मैदानाचा गेट मोडकळीस अवस्थेत आहे.
शौचालयाला टाळा मारून ठेवला आहे. सायंकाळी हे मैदान दारुड्यांचा अड्डा बनते. सुरक्षा रक्षक नसल्याने मैदानात सकाळपासून दारू आणि नशा करणार्या तरुणांची मैफल भरते. याचा वरिष्ठ नागरिक व महिलांना चालताना अडथळा होत आहे. रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. लहान मुलांना मैदानात खेळण्याचा आनंद मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका आर दक्षिण उद्यान विभागाने या मैदानावर जॉगिंग ट्रॅक, कुंपण भिंत, खेळणी व व्यायामाच्या साहित्याची सोय उपलब्ध करून दिल्यास नागरिक व खेळण्यासाठी येणार्या मुलांना मैदानाचा वापर करता येईल. कांदिवली महानगरपालिका विभागाने याकडे दुर्लक्ष न करता या मैदानाचे नूतनीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, महिला वर्गातून केली जात आहे.