

कोपरखैरणे : कोपरखैरणे भागात मनपाची मुख्य मलनिःस्सारण पाण्यावर प्रक्रिया करून सोडण्यात येणारी वाहिनी फुटल्याने तब्बल पाच फुटापर्यंत पाण्याचा फवारा उडत होता. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली.मनपाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.वाहिनी पूर्ण दुरुस्त करण्यास सुमारे 10 तास लागले.
नवी मुंबई मनपाचा मलनिःस्सारण प्रकल्प राज्यात सर्वोत्तम असल्याचे मनपा अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याचा प्रत्यय आजही आला. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणजे मलनिःस्सारण पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हेच पाणी औद्योगिक क्षेत्र व उद्यानासाठी वापरले जाते. कोपरखैरणे मलनिःस्सारण प्रक्रिया केंद्रापासून औद्योगिक क्षेत्राकडे साडेचारशे मिलीमीटर व्यासाची वाहिनी टाकण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोपरखैरणेकडे जाणार्या बोनकोडे बसथांब्याच्या मागील बाजूस ही वाहिनी अचानक फुटली. मुख्य वाहिनी असल्याने त्यातील उग्र वासाच्या पाण्याचा फवारा सुमारे चार ते पाच फुटापर्यंत उडत असल्याने अर्धा किमीच्या परिघात उग्र वास पसरला. सर्वात व्यस्त अशा वाशी कोपरखैरणे मार्गापासून नजरेच्या टप्प्यात हि घटना घडल्याने बघ्यांच्या गर्दीने काहीवेळ वाहतूककोंडीही झाली.ही जलवाहिनी जेथे फुटली तेथून जवळच रहिवासी परिसर असल्याने उग्र वासाचा त्रास शेकडो रहिवाशांना होत होता.
वास्तविक मनपा वेळोवेळी मलनिःस्सारण वाहिनीची देखभाल दुरुस्ती करते. त्याचे लाखो रुपयांचे देयक कंत्राटदाराला दिले जाते. वेळोवेळी देखभाल दुरुस्ती होत असल्याचा दावा एकीकडे करत असताना फुटलेल्या वाहिनीबाबत या पूर्वीच वाहिनी खराब झाली किंवा सडली ही बाब उजेडात येताच त्याची वेळीच दुरुस्ती अपेक्षेत असताना ती केली गेली नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्ती व कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
घटनेची चौकशी करणार
याप्रकरणी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त भरत धांडे यांना विचारणा केली असता मनपाची मलनिःस्सारण पुनर्प्रक्रिया पाणी वाहिनी फुटल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. याबाबत तातडीने अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, तंत्रज्ञ तसेच कामगार वर्गाला घटनास्थळी धाडण्यात आले आहे. अगोदर पाणी थांबवले जाईल व त्यानंतर दुरुस्ती केली जाईल. ही कामे विनाथांबा करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय मानवी दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला कि अपघाताने याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.