

मुंबई : बोरिवली, दहिसरमधील विविध प्रकल्पांमुळे बाधितांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणार्या घरांचे कामांची वर्कऑर्डर 2017 मध्ये देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या इमारतीचा पायाही रचला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त घरांच्या प्रतिक्षेत असून प्रकल्पही रखडले आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहेत. मात्र, या तांत्रिक अडचणी कोणत्या, हे सांगणे टाळले जात आहे. बोरिवली, दहिसर परिसरातील विविध नागरी प्रकल्पामुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवलीच्या आर मध्य विभागात येणार्या रस्ता क्र.3. सत्या नगर येथे प्रकल्पग्रस्तांसाठी 22 मजली दोन इमारती बांधण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला.
हे काम देव इंजिनीअर्स यांना देण्यात आली होते. त्यानुसार भूभाग क्र. 571, बोरीवली पश्चिम येथे 22 मजली एक इमारत उभारण्यात आली असून त्यातील सदनिकाचा प्रकल्पग्रस्तांना ताबाही देण्यात आला. मात्र दुसरी 22 मधली इमारत अद्याप उभारण्यात आली नाही. प्रकल्पग्रस्तांना घर न मिळाल्याने या भागातील रस्ते रुंदीकरणासह नाले रुंदीकरण, व अन्य विकास कामे रखडली आहेत.
वर्कऑर्डर दिल्यानंतर सहा महिन्याच्या पूर्वी कंत्राटदाराने इमारतीचे बांधकाम सुरू करणे बंधनकारक आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीच्या मंजुरीसाठी पडून होता. त्यामुळे इमारतीचं काम सुरू करणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महिनाभरात काम सुरू होणार
तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून सुधार समितीने प्रकल्पग्रस्तांची इमारत बनण्यास आता ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे लवकरच उर्वरित इमारतीचे काम सुरू होणार असल्याचे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले.
कंत्राटदाराला बंधनकारक कामे
इमारतीच्या बांधकामांना आवश्यक सर्व परवानग्या स्व:खर्चाने करणे
इमारतीस लागणारी पाण्याची, मलनिःसारणाची जोडणी व इलेक्ट्रीकची जोडणी स्वखर्चाने करणे
भूभागाचे सिमांकन जिल्हानिरिक्षक भूमीअभिलेखकडून स्वखचनि करणे
प्रकल्प ग्रस्तांच्या सदनिकांच्या इमारतीच्या बांधकाम कालावधीत सदर भूभागावर अस्तित्वात असलेल्या 79 झोपड्या स्वखर्चाने इतरत्र स्थलांतरीत करणे
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच इमारतीत करणे