कांदिवली : कांदिवली चारकोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सन राईझ मॉलसमोरील बसथांब्याच्या आजुबाजूने अनधिकृत व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. यामुळे बसथांबाच दिसत नाही. यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहूनच बसची वाट पहावी लागत आहे. यावेळी बसचालक बस रस्त्यावरच उभी करत असल्याने पाठीमागे वाहतूककोंडी होते. बसथांब्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून बसथांबा मुक्त करावा, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून केली जात आहे.
कांदिवली पश्चिम स्टेशनपासून चारकोप, गोराई व बोरिवलीकडे तसेच लांब पल्ल्याच्या चारकोप आगार आणि गोराई आगार येथे जाणाऱ्या बसेस याच थांब्यावरून जातात. चारकोप सन साईझ मॉलच्या समोरच बसथांबा आहे. या बसथांब्यावर प्रवाशांची संख्याही जास्त असते. मात्र बसथांब्याला शेड नसून एक खांबा उभा आहे.त्यातच बस थांब्याच्या आजूबाजूने अनधिकृत व्यावसायिकांनी बस्तान मांडल्याने बसथांबा दिसतच नाही.
अनधिकृत व्यवसायिकांच्या आजूबाजूला मॉलमध्ये येणारे ग्राहक दुचाकी उभ्या करतात. यामुळे व्यावसायिक, उभी राहणारी वाहने या समस्यांना तोंड देत नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपली बस पकडण्यासाठी चक्क रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. प्रवासी रस्त्यावर उभे राहत असल्याने बसचालकही रस्त्यावरच बस उभी करतात. अशा वेळेस बसच्या मागे असलेल्या वाहनांना थांबावे लागते. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. प्रवाशांनाही तारेवरची कसरत करतच बस पकडावी लागत असते.
याकडे महापालिका, वाहतूक विभाग आणि बेस्ट प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे बसण्याची आसने व शेड टाकावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून बस थांबा मुक्त करावा, जेणेकरून प्रवाशांना बस पकडण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. यामुळे जेष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल होणार नाहीत.शिवाजी कैले, बस प्रवासी, सामाजिक कार्यकर्ते