कांदिवली : कांदिवली पश्चिमेतील एका घरात पाच वर्षांच्या मुलीवर 16 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मुलीला रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला वेळेत उपचार न मिळाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुलगी खेळत असताना 16 वर्षीय मुलाने तिला आपल्या घरात नेल व तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत घरी आली व आपल्या आजीला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. स्थानिकांनी त्या मुलाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले व मुलीला कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मुलीला तत्काळ उपचार न देता माहिती घेण्यात वेळ घालवला. त्यामुळे स्थानिकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र रक्तस्राव थांबत नसल्याने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र यात अडीच तास गेल्याने पालकांसह स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
डॉक्टरांवर कारवाईची मागणी
भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दीपक बाळा तावडे, गटनेते कमलेश यादव तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी बुधवारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता अजय गुप्ता यांची भेट घेत मागणी केली आहे.
प्राथमिकत पासणीत अनावश्यक विलंब झालेला नाही. सायंकाळी 7.40 वाजता मुलीला रुग्णालयात आणले होते. रक्तस्राव जास्तच असल्याने हेमोडायनामिकली स्थिर करण्यासाठी प्राथमिक उपचार तातडीने दिले. बाह्य जखमेची साफसफाई आणि ड्रेसिंग करण्यात आली. योग्य आणि तातडीच्या उपचारासाठी नायर रुग्णालयात पाठविण्यात आले.अजय गुप्ता, वैद्यकीय अधिष्ठाता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय.