

गारगोटी : म्हासरंग येथील जंगलामध्ये शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना कडगाव वन विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 173 जिवंत गावठी बॉम्ब, लगोरी, चाकू, कोयता, मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी राजाराम बापू देसाई (वय 65, रा. पाळ्याचाहुडा, ता. भुदरगड) व दिल बहादूर सिंग (46, रा. बिजवाडा, हल्ली पिल्लकी कॅम्प सदाशिवपुरा होसुडी, जि. शिमोगा, कर्नाटक) या दोघांना अटक करण्यात आली.
वनरक्षक पथक गस्त घालत असताना राजाराम बापू देसाई व दिल बहादूर सिंग हे दोघे पायवाटांवर बकर्याची चरबी लावलेले जिवंत गावठी बॉम्ब ठेवत असल्याचे आढळून आले. त्यांची झडती घेतली असता जिवंत गावठी बॉम्ब व शिकारीचे साहित्य आढळून आले. या दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. ही कारवाई वनक्षेत्रपाल राजेश दत्तात्रय चौगुले, वनपाल दत्तात्रय जाधव, वनरक्षक गणेश लोकरे, दत्ता होनमने, दिलीप आबिटकर, वनसेवक श्रीमती उमा पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.