Jogeshwari Trauma Care Hospital Pudhari
मुंबई

Jogeshwari Trauma Care Hospital: ट्रॉमा रुग्णालय व्हेंटिलेटरवर; सीटी स्कॅन, सोनोग्राफी बंद

काही विभागांतील डॉक्टरही गैरहजर; रुग्णांचे प्रचंड हाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालय सध्या गंभीर अवस्थेत असून रुग्णालयातील सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी मशीन गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांच्या निदान प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच काही विभागांतील डॉक्टर गैरहजर असल्याने दाखल रुग्णांच्या उपचारांवर थेट परिणाम होत आहे.

300 खाटांच्या या रुग्णालयात ओपीडीमध्ये दररोज 500 ते 1000 रुग्णांची गर्दी असते, तर सुमारे 100 रुग्ण रोज दाखल होतात. याशिवाय दररोज चार ते पाच शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, अत्यावश्यक यंत्रणा बंद पडल्याने आणि वैद्यकीय मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्णालयातील आरोग्यसेवा सध्या पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे गंभीर रुग्णांची तपासणी रखडली आहे. यामुळे उपचारात विलंब होत असून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, अशी तक्रार करण्यात येत आहे.

याचदरम्यान, औषध विभागातील काही डॉक्टर अनुपस्थित असल्याचे समोर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. दाखल रुग्णांच्या देखरेखीवर याचा विपरीत परिणाम होत असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही.

वैद्यकीय अधीक्षकांची बदली

या प्रकारामुळे प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हनुमंत वायकुळे यांची बदली करण्यात आली असून, नवीन अधीक्षक डॉ. बलराम बसवत सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. “पदभार स्वीकारल्यानंतरच परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊ,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT