

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची खड्डे मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून आतापर्यंत 73 टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. त्याशिवाय 13.8 टक्के रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर 13 टक्के रस्त्यांची कामे अजून सुरू झाली नसून पुढील वर्षी ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी महापालिकेने गल्लीबोळासह मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुंबई शहरात 710 किमी लांबीचे रस्ते आहेत. यातील 355 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.
तर 164 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर उर्वरित 92 किमी रस्त्याची कामे पुढील वर्षी हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांचे प्रमाण कमी होणार आहे. येत्या दोन वर्षात रस्त्यांचे 100 टक्के काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळणार असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे गेल्या तीन वर्षात रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मुंबई पालिकेने केला आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणाऱ्या खर्चामध्येही 2024 मध्ये सुमारे 30 टक्के कपात तर 2025 मध्ये 51 टक्केपर्यंत कपात झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या खर्चात अजून कपात होणार असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.