

मुंबई: पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शेवटच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असताना, दुसरीकडे मुंबईतील काही केंद्रांवर चौथीच्या मराठी प्रश्नपत्रिकेत झालेल्या गंभीर तांत्रिक घोळामुळे मुंबईतील काही भागात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रश्नपत्रिकेची पाने चुकीच्या क्रमाने जोडली गेल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न समजण्यात अडचणी आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी इयत्ता पाचवी (पूर्व माध्यमिक) आणि इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर पार पडली. इयत्ता पाचवीसाठी एकूण 6 लाख 94 हजार 597 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी 6 लाख 57 हजार 77 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले, तर 37 हजार 520 विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण उपस्थिती टक्केवारी 94.60 इतकी होती. तर इयत्ता आठवीसाठी 4 लाख 62 हजार 138 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 33 हजार 857 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 28 हजार 281 विद्यार्थी गैरहजर राहिले.
मुंबईतील विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द या परिसरांतील काही शाळांमध्ये इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पानांचा क्रम पूर्णतः विस्कळीत असल्याचे निदर्शनास आले.
दुसऱ्या पानानंतर थेट पाचवे पान, त्यानंतर सहाव्यानंतर तिसरे-चौथे आणि चौथ्या पानासमोर सातवे पान असे उलटसुलट क्रम विद्यार्थ्यांसमोर येत होते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8 नंतर अपेक्षित प्रश्न न दिसता भलतेच प्रश्न समोर येत असल्याने विद्यार्थी भांबावून गेले.
गोवंडीतील एका शिक्षकाने सांगितले की, उताऱ्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांना योग्य संदर्भच मिळत नव्हता. अनेक विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांकडे तक्रार केली; मात्र प्रश्नपत्रिका परीक्षा परिषदेकडूनच पाठवली जात असल्याने केंद्रस्तरावर तातडीने उपाय करणे शक्य झाले नाही.
विक्रोळीतील एका पर्यवेक्षक शिक्षिकेने सांगितले की, प्रश्नपत्रिका बांधणीच्या प्रक्रियेतच ही चूक झाल्याची शक्यता आहे. या प्रश्नपत्रिकेच्या काठिण्यपातळीवरही शिक्षकांनी आक्षेप नोंदवला.
चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘साजशृंगार’ आणि ‘प्रत्ययघटित’ यांसारखे शब्द अवघड असल्याची टीका करण्यात आली. पेपर तयार करताना विद्यार्थ्यांच्या वयानुरूप पातळीचा विचार व्हायला हवा होता, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.