बातमी प्रसिध्द होताच मनपाचे उघडले डोळे pudhari photo
मुंबई

Mumbai civic issues : बातमी प्रसिध्द होताच मनपाचे उघडले डोळे

जोगेश्वरी पूर्वच्या शौचालय परिसरातील घाण पाण्याचा निचरा

पुढारी वृत्तसेवा

गोरेगाव : जोगेश्वरी पूर्वेकडील गुंफा रोडवरील स्वामी चाळ परिसरात सार्वजनिक शौचालयाभोवती साचलेल्या घाण पाण्याच्या समस्येची अखेर महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. या संदर्भात दै. पुढारीत वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने घटनास्थळी जाऊन साचलेले पाणी हटवले असून तात्पुरत्या स्वरुपात पाण्याचा निचरा करण्यात आला आहे.

महिनाभरापासून शौचालय परिसरात घाण पाणी साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.नागरिकांना घाणीच्या पाण्यातूनच शौचालयाकडे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात होता.

शौचालय परिसरात साचलेले पाणी हटवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच समस्येकडे वेळेवर लक्ष वेधल्याबद्दल माध्यमांचेही नागरिकांनी आभार मानले आहेत. ‌‘महिनाभर आम्ही घाण पाण्यातूनच ये-जा करत होतो. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन जागे झाले. निदान आता तरी आमचा त्रास कमी झाला‌’, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

मात्र, सदर ठिकाणी ड्रेनेज लाईनमधील गाळ अद्याप साचलेला असून शौचालयाजवळील फरशा तुटलेल्या अवस्थेत आहेत.‌‘तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी आणि गाळ लवकरात लवकर साफ करावा, अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT