नवी मुंबई : राजेंद्र पाटील
नवी मुंबईतील जेएनपीए बंदरात युद्धाच्या परिस्थितीमुळे गेल्या चौदा दिवसांपासून अडकून पडलेल्या शेतमालाचे कंटेनर्स बाहेर काढण्यासाठी शिपिंग कंपन्या आणि एजंट एक कंटेनरसाठी तीन ते चार लाख रुपये वसूल करत असल्याचा आरोप निर्यातदार राहूल पवार यांनी दै. पुढारीशी बोलताना केला.
यामध्ये मॅजेस्टिक शिपिंग लाईन, आर.गोसी, मास्टर लॉगीटेक आणि शिसोल या लहान शिपिंग कंपन्यांचा समावेश असल्याचे पवार म्हणाले. जेएनपीए बंदरात सर्वाधिक केळीचे 600 कंटेनर्स अडकून पडले आहेत.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका कृषी मालाच्या निर्यातीला बसला आहे. जेएनपीएमध्ये 10 दिवसांपासून इराण आणि इराक या देशात निर्यातीसाठी पाठवलेले केळीचे 600 कंटेनर अडकले आहेत. द्राक्ष आणि कलिंगडाचे सुमारे 50 कंटेनर अडकून पडले आहेत. एका कंटेनरमध्ये नऊ ते बारा लाख रुपयांचा माल भरलेला आहे. केळीचा सर्वाधिक माल महाराष्ट्रातील सोलापूर, टेंभुर्णी, करमाळा, इंदापूर, जळगाव आणि आंध्रप्रदेश येथील आहे. यातील शंभर कंटेनर केळी नवी मुंबईतील वेगवेगळ्या कोल्डस्टोरेजमध्ये ठेवण्यात आली आहे. मात्र दहा दिवसानंतर हा नाशवंत माल निर्यात झाला नाहीतर दोनशे कोटींचे नुकसान होईल, असे निर्यातदार राहूल पवार यांनी सांगितले.
याचा अर्थ दहा दिवसानंतरही निर्यात सुरु झाली नाहीतर ऐंशी टक्के नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका निर्यातदारांना सहन करावा लागणारा आहे. केंद्र सरकारने निर्यातदारांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले असले, तरी जेएनपीएमधील शिपिंग कंपन्यांकडून निर्यातदारांची मोठी आर्थिक लूट होत आहे.
जेएनपीए बंदरात कांदा,द्राक्ष, कलिंगड आणि केळीचे कंटेनर 10 दिवसापासून उभे आहेत. यात बॅक टू टाऊन (माल परत आणणे) प्रक्रिया थोडी सोपी केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. काही कंटेनर परत नेण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी शिपिंग कंपन्यांची आणि एजंटची मनमानी सुरु आहे. शिपिंग कंपन्यांसाठी सरकारने ज्या काही एसओपी जाहीर केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी होत नाही.
याचा मोठा फटका निर्यातदारांना बसत आहे. त्यांना प्लगिंग कॉस्ट आणि इतर खर्च भरावे लागत आहेत. एका कंटेनरसाठी 8 दिवसांचे शुल्क साधारणतः 3 ते 4 लाख रुपये इतके येत आहे. अडकलेला कंटेनर परत कोल्ड स्टोरेजला न्यायचा की तिथेच पडू द्यायचा, अशा द्विधा मनस्थितीत निर्यातदार आहेत. 5 कंटेनरसाठी 16 लाख रुपये जर फक्त प्लगिंग कॉस्ट आणि रिटर्न आणण्याचा खर्च म्हणून शिपिंग लाईनला द्यावे लागत असतील, तर ही किंमत मालाच्या एकूण किमतीच्या जवळजवळ अर्धी आहे.
दुबईचे पोर्ट बंद असले तरी शेजारील कोरफोकन पोर्टसाठी सेवा सुरू झाली आहे. मात्र, तिथे जाण्यासाठी शिपिंग कंपन्या 6 ते 7 पट जास्त भाडे वॉर सरचार्ज म्हणून आकारत आहेत. इराणच्या जहाजांनी सेवा सुरू केली आहे, पण त्यांनीही भाडे 4 पट वाढवले आहे आणि ते एका ठराविक अंडरटेकिंगवरच माल घेत असल्याचे निर्यातदारांकडून सांगण्यात आले.