मुंबई : राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन 2026 सत्र-1 परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आला. या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत देशभरातील 12 विद्यार्थ्यांनी परिपूर्ण 100 एनटीए पर्सेंटाइल मिळवले असून, त्यात महाराष्ट्राच्या माधव विराडिया याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
एनटीएकडून ही परीक्षा 21 ते 28 जानेवारीदरम्यान संगणकाधारित पद्धतीने विविध सत्रांमध्ये घेण्यात आली. देशातील 326 शहरांतील 658 परीक्षा केंद्रांवर आणि 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. पेपर-1 (बीई/बीटेक) साठी एकूण 13 लाख 55 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख 4 हजार 653 उमेदवार (96.26 टक्के ) इतके परीक्षेला बसले होते. या निकालात महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांतील एकूण 12 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए पर्सेंटाइल मिळवत अव्वल यादीत स्थान मिळवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा माधव विराडिया याने 100 पर्सेंटाइल गुणांसह राज्यातील टॉपर म्हणून नाव नोंदवले आहे.
जेईई मेन 2026 सत्र-2 नंतर दोन्ही सत्रांतील सर्वोत्तम गुणांच्या आधारे अंतिम क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, अनियमितता आढळल्यामुळे 68 उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले नसल्याची माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
माधव विराडिया हा मूळचा गुजरातमधील वडोदरा येथील आहे. माधवचे वडील गुजरातमध्ये अभियंता असून स्वतःचा व्यवसाय चालवतात, तर त्याचा मोठा भाऊ आयआयटी जोधपूर येथे शिक्षण घेत आहे. आठवीत असतानाच अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो कोटा येथे गेला होता. दहावीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जेईईची तयारी करण्यासाठी तो मुंबईत स्थायिक झाला. जेईई मेनच्या पहिल्याच प्रयत्नात त्याने 100 पर्सेंटाइल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली असून सध्या मी बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार आहे. तसेच जेईई ॲडव्हान्सची तयारीही सुरू केली आहे, असे माधवने सांगितले. तसेच 2 ते 9 एप्रिलदरम्यान होणाऱ्या जेईई मेन सत्र-2 परीक्षेलाही बसणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.