मुंबई : शिवसेनेचे मनसेसोबत जुळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी वांद्रे येथे मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व मुंबईत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली.
उद्धव भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, उमेदवारी अर्ज सादर करण्यास केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुद्दामहून आलो होतो. बरीच चर्चा झाली. पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत. त्यामुळे मुंबईत शिवसेनेशी आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे.
काँग्रेस, शिवसेना (उबाठा ) अशी महाविकास आघाडी मुंबईत एकत्र यावी, अशी आमची धारणा होती. आमच्या पक्षाची मुंबई शहरात काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या पक्षांएवढी ताकद नाही. त्यामुळे मागील निवडणुकीत आम्ही विजयी झालेल्या जागा आम्हाला सुटाव्यात अशी आमची मागणी आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
विक्रोळी-भांडुपचा तिढा
ठाकरे बंधू व शरद पवार गटात विक्रोळी - भांडुप परिसरातील जागांवरून पेच निर्माण झाला आहे. येथील दोन वॉर्डांवरून युतीची चर्चा रखडली आहे. त्यामुळे जयंत पाटील व उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीत या मुद्द्यावर तोडगा निघाला नसल्याचे समजते.