मुलुंड : मुंबई पोलिसांकडून वारंवार सायबर-जागरूकता मोहिमा राबवूनही, विशेषतः डिजिटल अटकेबद्दल इशारे देऊनही, ज्येष्ठ नागरिक अजूनही यास बळी पडत आहेत. मुलुंडमधील एका वृद्ध दाम्पत्य अलिकडेच एका सायबर फसवणुकीला बळी पडले आहे. यामध्ये घोटाळेबाजांनी गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून 32.80 लाख रुपये उकळले.
पूर्व विभाग सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी पीडितेला गुन्हे शाखेचे अधिकारी संदीप रॉय म्हणून ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. 2.5 कोटींचा मनी-लाँडरिंगचा व्यवहार तिच्या पतीच्या बँक खात्यातून झाला असून त्यांना आणि तिच्या पतीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे, असे रॉय याने सांगितले.
दुसऱ्या दिवशी, त्या महिलेला पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन पुरूषांनी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. त्यांनी स्वतःची ओळख गुन्हे शाखेच्या कुलाबा युनिटमधील अधिकारी दीपक रॉय आणि दीपक जयस्वाल अशी सांगितली. ‘सहकार्य’ केले तर अटक टाळता येईल असे सांगत तिला तिचा बँक बॅलन्स आणि दागिन्यांची माहिती देण्यास सांगितले. यावर विश्वास ठेवून आपल्या युनियन बँकेतील खात्यात 37 लाख रुपये असल्याचे तिने त्यांना सांगितले.
13 नोव्हेंबरपर्यंत फसवणूक करणाऱ्यांनी तिला एका विशिष्ट बँक खात्यात 32.80 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. हे जोडपे मुलुंड (पश्चिम) शाखेत गेले आणि आरटीजीएस ट्रान्सफर पूर्ण केले. नंतर या भामट्यांना पावती दिली. सदर प्रकरण आता अंमलबजावणी संचालनालयाकडे गेले असल्याची थापही त्यांनी मारली.
दुसऱ्या दिवशी घोटाळेबाजांनी फसवणूक पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि व्हॉट्सॲपद्वारे पुन्हा तिच्याशी संपर्क साधला आणि तिला तिच्या बँक लॉकरमधून सोन्याचे दागिने काढून मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवण्याचे निर्देश दिले. मुथूटचा एक व्यवस्थापक तिच्यासोबत पडताळणीसाठी बँकेत गेला. सुदैवाने त्या संध्याकाळी तिचा जावई आला, त्याने घटनाक्रम ऐकला आणि लगेच लक्षात आले की या जोडप्याची फसवणूक झाली आहे.
त्यानंतर महिलेने मुलुंड पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता त्यांनी तिचा प्राथमिक जबाब नोंदवत हे प्रकरण पूर्व क्षेत्र सायबर पोलिसांकडे सोपवले.पोलिसांनी या प्रकरणात वापरलेले फोन नंबर आणि बँक खाती शोधण्यास सुरुवात केली आहे.