मुंबई ः गेल्या 8 वर्षांत बॉलीवूडमधील सत्ता ही सर्जनशील नसलेल्यांच्या हातात गेली आहे, हे सर्जनशील नसलेले लोक गटबाजी आणि पक्षपातीपणे कामे देतात, कदाचित त्यामागे सांप्रदायिक भावही असू शकेल, अशा अर्थाने संगीतकार ए. आर. रहेमान यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास केला जात आहे, असे मत प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. आपण अश्लीलता आणि चुकीची भाषा असलेले चित्रपट नाकारतो, या दोन त्तत्वांमुळे आपण आजवर अनेक चित्रपट नाकारल्याचा दावाही त्यांनी केला.
अलीकडे ए. आर. रहेमान यांनी गेल्या आठ वर्षांत बॉलीवूडमध्ये आपल्याला खूपच कमी संधी मिळाल्या असल्याचे सांगितले. या संधी कमी होण्यामागे चित्रपटसृष्टी सांप्रदायिक होत चालली आहे, असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी आपली मते माध्यमांसमोर व्यक्त केली आहेत.
ए. आर. रहेमान यांना चित्रपटसृष्टीत प्रचंड आदर आहे. या आदरामुळे आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे, त्यांच्या व्यक्तीमुळे अनेकजण त्यांच्याशी संपर्क साधण्यास कचरतात, ते आवाक्याबाहेरचे संगीतकार आहे, असे छोट्या निर्मात्यांना, कंपन्याना वाटते असे मत त्यांनी नोंदवले. रहेमान कधीही असे विधान करतील, याबाबत जावेद अख्तर यांनी साशंकता व्यक्त केली.
हिंदी चित्रपटसृष्टीत, विशेषतः तमिळ समुदायातील लोकांबाबत किंवा महाराष्ट्राबाहेरील लोकांबाबत पक्षपात होतो का, असा प्रश्न विचारला होता. यावर रहेमान यांनी आपण वैयक्तिकरित्या कोणत्याही भेदभावाला सामोरे गेलो नसल्याचे सांगितले, मात्र उद्योगातील सत्तासंरचनेत झालेला बदल हे एक कारण असू शकते, असे सूचित केले होते.
मीही अनेक चित्रपटांवर सोडले पाणी!
जावेद अख्तर यांनी आपला चित्रपटसृष्टीतील कामाचा स्वानुभवही सांगितला. ते म्हणाले, मी काम करताना चित्रपटात अश्लीलतेचा अंश दिसला तरी मी त्या चित्रपटातून बाहेर पडतो. तसेच चुकीची भाषा किंवा खराब व्याकरण असेल तर मी तो चित्रपट नाकारतो, कारण दुसऱ्याला भाषा येत नाही म्हणून मी माझ्या गाण्याशी तडजोड करत नाही, या कारणामुळे मी अनेक चित्रपटांवर पाणी सोडल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितले.