मुंबई : आमच्या शिवसेनेचा महापौर व्हावा हे आमचे स्वप्न आहे. देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल. हा देवा म्हणजे मेवा नाही. थोडा फरक आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले आणि निराळ्याच चर्चेला उधाण आले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाची दखल घेतानाच शिंदे यांच्या कथित फॉर्म्युल्यावरही आपली भूमिका मांडली.
नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यातले लक्षवेधी विधान ठरले ते महापौरपदाबद्दलचे. उद्धव म्हणाले, मुंबई महापालिकेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी जातील.यांनी तिजोरी कशी खाली केली याचा भांडाफोड हे आमचे प्रतिनिधी करतील. देवाची इच्छा असेल तर आमचा महापौरही होईल...
उद्धव यांच्या विधानातील ‘देवा’चा उल्लेख सूचक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर अत्यंत टोकदार भाष्य केले. फडणवीस म्हणाले, देवा म्हणजे कोण? मी की देव? कारण, मलाही लोक देवा किंवा देवाभाऊ म्हणतात... अर्थात मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल ही परमेश्वराचीच इच्छा होय.
महापौर कोण व्हावा, तो कधी निवडला जावा, किती वर्षांसाठी तो निवडला जावा हे सारे निर्णय मी स्वत:, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे पक्षनेते मिळून ठरवतील. महापौरपदावरून आमच्यात कोणताही वाद नाही, असे फडणवीस म्हणाले.