India US Meeting Pudhari
मुंबई

India US Meeting: दिल्लीऐवजी मुंबईत होणार भारत-अमेरिका ऊर्जा चर्चा

भारत-अमेरिका संबंध, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर २० ऑक्टोबर रोजी मुंबईत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी याबाबतची अधिकृत माहिती दिली. या बैठकीत भारत-अमेरिका संबंधांचा आढावा घेतला जाईल, दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा होईल. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे देखील या चर्चेचा भाग असतील.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही बैठक दोन्ही देशांमधील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची एक संधी असेल.

अंबानींची भेट घेण्याची शक्यता

रुबियो गुजरातच्या जामनगरला जाण्याचीही शक्यता आहे. तिथे ते रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ शकतात. भारतातील अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी (राजदूत) सर्जिओ गोर यांनी गुरुवारी नवी दिल्लीत 'ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम'दरम्यान ही माहिती दिली होती. रुबियो रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचीही भेट घेऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, जयशंकर १९ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्र्यांचेही आतिथ्य करणार आहेत. २० ऑक्टोबर रोजी ते अमेरिकेच्या २५० व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

मुंबईतील बैठकीवर मंत्रालयाचे स्पष्टीकरण

जयशंकर आणि रुबियो यांची बैठक दिल्लीऐवजी मुंबईत होणार असल्याबद्दलही काही प्रश्न उपस्थित झाले होते. काँग्रेसने गुरुवारी या प्रस्तावित भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर बोलताना जयस्वाल म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने अनेक वेळा परदेशी नेते आणि प्रतिनिधी मंडळांचे स्वागत राष्ट्रीय राजधानीबाहेरही केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT