मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन त्याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.
मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती/सूचना मागविण्याची कार्यवाही देखील महानगरपालिका प्रशासनाने केली.
या पार्श्वभूमीवर मुंबई जैन संगठनचे नितीन व्होरा, मुकेश जैन, अतुल शहा,विजय जैन, अध्यात्म परिवाराचे हितेश मोटा आदींनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली.