Jagjivan Ram Hospital Blood Bank Pudhari
मुंबई

Jagjivan Ram Hospital Blood Bank: जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित; एफडीएला १२ त्रुटी आढळल्या

१५ आणि १६ ऑक्टोबरला रक्तपेढीचे कामकाज बंद; नियमभंगाबाबत स्पष्टीकरण असमाधानकारक ठरल्याने कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयातील रक्तपेढीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दोन दिवसांसाठी निलंबित केला आहे. एफडीएच्या मार्च महिन्यातील तपासणीत रक्तपेढीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १२ त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानंतर दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएच्या औषध निरीक्षकांनी २५ मार्च २०२६ रोजी रक्तपेढीची तपासणी केली होती. त्यामध्ये रक्तदानासाठीच्या रक्तपेशी संकलन प्रक्रियेतील आवश्यक नमुना अद्ययावत नसणे, औषध कायदा आणि भारतीय औषधकोशाची अद्ययावत प्रत उपलब्ध नसणे, आपत्कालीन औषधांच्या नोंदी नसणे, रक्तपेशी संकलन कक्षात आवश्यक कॅल्शियमच्या गोळ्या उपलब्ध नसणे, रक्तदान शिबिरांपूर्वी व नंतरच्या परवानगी आणि माहितीच्या नोंदी न ठेवणे, अशा त्रुटी आढळल्या.

तसेच रक्तदान शिबिरात मंजूर नसलेल्या व्यक्तीची ‘समुपदेशक’ म्हणून नोंद, रक्तसंकलनाचे प्रमाण पाच हजार युनिटपेक्षा अधिक असताना आवश्यक मनुष्यबळाची कमतरता, रक्तसाठवणूक करणाऱ्या शीतकपाटाच्या तापमान नोंदींचे स्वतंत्र पुस्तक नसणे, अधिकृत स्वाक्षऱ्यांसह साठा नोंदवही नसणे, रक्तपिशवी पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेबाबत अपूर्ण कार्यपद्धती आणि जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीच्या कार्यपद्धतीत त्रुटी आढळल्या.

याशिवाय रक्तदात्यांमध्ये संसर्गजन्य आजार आढळल्यास त्यांच्या समुपदेशनानंतरच्या पाठपुराव्याच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

रक्तपेढीने बहुतांश त्रुटी तपासणीनंतर दूर केल्याचे सांगितले. मात्र, तपासणीनंतर केलेल्या सुधारणा या तपासणीच्या वेळी झालेल्या नियमभंगाला माफ करू शकत नाहीत, असे एफडीएने स्पष्ट केले. त्यानंतर ९ एप्रिलला कारणे दाखवा नोटीस, २९ एप्रिलला रक्तपेढीचे स्पष्टीकरण आणि १५ मे रोजी वैयक्तिक सुनावणी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT