Iran Stability Analysis Pudhari
मुंबई

Iran Stability Analysis: इराणमध्ये शोक, संताप अन्‌‍ जल्लोष!

इराणमध्ये तूर्त जनतेचा उठाव अशक्य; राजवट अभेद्य

पुढारी वृत्तसेवा

हुकूमशाहीच्या हातातून देश हिसकावून तुमच्या ताब्यात घ्या. ही इराणी जनतेला मिळालेली आजवरची सर्वांत मोठी संधी होय.

- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष

हीच ती वेळ, हुकूमशाहीची राजवट उलथवून टाका आणि तुमचे भवितव्य तुम्ही ठरवा.

- बेन्जामिन नेत्यान्याहू, इस्रायली पंतप्रधान

इराणवर हल्ला करणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी इराणी जनतेला सरळसरळ खामेनी राजवटीविरुद्ध उठाव करून सत्ता ताब्यात घेण्याची चिथावणी रविवारी दिली. या चिथावणीला इराणच्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेचा प्रतिसाद मात्र मिळालेला नाही. कारण, तेहरानसह सर्व मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांवर उतरलेला लाखोंचा जनसमुदाय एकाच वेळी अमेरिकेला मृत्युदंड ठोठावण्याची भाषा करतो आहे आणि अनेक ठिकाणी हाच समुदाय खामेनींच्या मृत्यूचेही स्वागत करताना दिसतो. थोडक्यात रस्त्यावर उतरलेली इराणी जनता दुभंगलेली आहे.

एखाद्या देशाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आणि जनतेचे राज्य येण्यासाठी तीन गोष्टी लागतात. सशक्त संघटना, संघटनेच्या चळवळीला गती आणि सत्तारूढ गोटात पडलेली फूट. इराणमधील आजचे चित्र काय सांगते?

1 खामेनींच्या खात्म्यानंतरही इराणची राजवट लष्करावर नियंत्रण ठेवून आहे आणि राजशकट हाकते आहे. त्यात रस्त्यावर होणारी निदर्शने एकसारखी नाहीत. ती अमेरिका आणि इस्रायलच्याही विरोधात तीव्र आहेत. खामेनींच्या मृत्यूचेही स्वागत करणारे जमाव दिसतात. पण ते क्षीण आहेत.

2खामेनींच्या हत्येनंतर जल्लोष आणि निषेध हा भावनांचा आवेग ओसरल्यानंतर इराणी राजवटीची सुरक्षा दले संपूर्ण इराणात सामूहिक अटक सत्र सुरू करण्याची चिन्हे आहेत. मोबाईल, नेट बंद आहेच, त्यात संचारबंदीही लागू केली जाईल. सुरक्षा दलाच्या हिंसाचाराचाही तडाखा जनतेला बसेल.

3इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड म्हणजेच इराणच्या लष्कराचे बडे अधिकारी राजकीय, आर्थिक सत्तेचे लाभार्थी ठरत आले असून, त्यांचा थेट संबंध सर्वोच्च नेते खामेनी यांच्याशी राहात आला आहे. त्यामुळे हे गार्डचे अधिकारी एक तर किंगमेकर म्हणून निर्णायक भूमिका घेतील किंवा धर्मगुरूंची सत्ता क्षीण झाल्यास अप्रत्यक्षपणे राज्यकर्ते बनतील.

4अयातुल्ला खामेनी यांचा वारस नेमला जाईपर्यंत इराणच्या सर्वोच्च परिषदेचे हंगामी प्रमुख म्हणून अलीरेजा अराफी यांची नियुक्ती करण्यात आली. इराणची सत्ता जे तीन जण चालवतात त्यात लीडरशीप काऊन्सिलच्या प्रमुखासह (या पदावर अयातुल्ला खामेनी होते.) राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन आणि मुख्य न्यायाधीश गुलाम हुसैन मोहसेनी इजेई यांच्या जोडीला आता अलीरेजाही दाखल होतील. या तिघांचे हंगामी पॅनल इराणचा कारभार चालवेल.

- इराणची जनता रस्त्यांवर अखंड उतरू शकत नाही किंवा चौकांचा ताबाही घेण्याची शक्यता नाही. एक दिवसाची निदर्शने सर्व काळ चालणार नाहीत.

-इराणचे लष्करही अमेरिका किंवा इस्रायलच्या बहकाव्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे लष्कर विरुद्ध धर्मगुरू अशी दुफळी निर्माण होण्याची आशा नाही.

-अमेरिका-इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले वाढत गेल्यास राजवट उलथवून टाकण्याऐवजी जीव वाचवण्याला इराणी जनतेला प्राधान्य देईल. या युद्धजन्य परिस्थिती इराणी हुकूमशाही राजवट आपली मांड पक्की करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT