IPS Rashmi Karandikar Husband Purushottam Chavan fraud case
मुंबई : मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर (वय 51) सध्या मोठ्या कायदेशीर पेचप्रसंगात अडकल्या आहेत. त्यांच्या पतीवर तब्बल 32 कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचे आरोप आहेत.
आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि सक्तवसुली संचालनालय (ED) कडून त्यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण (वय 53) यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर काय आरोप आहेत?
पुरुषोत्तम चव्हाण यांनी 2015 ते 2024 दरम्यान सहा लोकांकडून 7.42 कोटी रूपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी या लोकांना स्वस्त दरात शासकीय भूखंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, तसेच नाशिक पोलिस अकॅडमीसाठी टी-शर्ट आणि हूडी पुरवठ्याचा करार मिळवून देण्याचाही दावा केला होता.
त्याचबरोबर 2014 ते 2019 दरम्यान 19 जणांना स्वस्त घरे मिळवून देण्याचे आश्वासन देत तब्बल 24.78 कोटी रुपये उकळल्याचे उघड झाले आहे.
20 मे 2024 रोजी ईडीने चव्हाण यांच्या कुलाबा येथील राहत्या घरी छापा टाकला. TDS परतावा म्हणून 263.95 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात हा छापा टाकण्यात आला होता. यावेळी अनेक दस्तऐवज, करारपत्रे जप्त करण्यात आली असून ती ईओडब्ल्यूकडे पाठवण्यात आली. त्यावरूनच दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पतीवर गुन्हा दाखल झाल्याने रश्मी करंदीकर का अडचणीत आल्या आहेत?
रश्मी करंदीकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र ईओडब्ल्यूकडून त्यांच्या बँक खात्यांमधील व्यवहारांची चौकशी सुरू आहे. त्यांना पतीच्या खात्यांतून तब्बल 2.64 कोटी जमा झाल्याचे समोर आले आहे.
हे व्यवहार त्यांनी संपत्ती जाहीरनाम्यात नमूद केले आहेत का, याची माहिती घेण्यासाठी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे पत्र पाठवण्यात आले आहे. दोषी आढळल्यास भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे (ACB) प्रकरण पाठवण्यात येईल, असे ईओडब्ल्यूने सांगितले.
पतीने पत्नीच्या पोस्टचा फसवणुकीसाठी वापर केला?
आरोपांनुसार, चव्हाण यांनी रश्मी करंदीकर यांचा दर्जा आणि अधिकार वापरून लोकांचा विश्वास संपादन केला. सरकारी भूखंड दाखवताना त्यांनी रश्मींच्या अधिकृत मारुती एर्टिगा गाडीचा वापर केला. सोबत अधिकृत चालक आणि गणवेशात असलेले शिपाई होते.
तसेच एका कराराच्या वेळी त्यांनी रश्मींच्या कुलाबा येथील शासकीय निवासस्थानी व्यावसायिकांची भेट घेऊन व्यवहार पूर्ण केला होता. नाशिक पोलीस अकॅडमीत रश्मी करंदीकर या अतिथी प्राध्यापक आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.
रश्मी करंदीकर कोण आहेत?
रश्मी करंदीकर यांनी मुंबई विद्यापीठातून BSc (सांख्यिकी), MA (समाजशास्त्र व मानववंशशास्त्र) आणि PhD पूर्ण केली आहे. त्यांनी 2004 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चव्हाण यांची ओळख झाली. पुढे 2005 मध्ये त्यांनी विवाह केला. रश्मी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून डेस्क ऑफिसर परीक्षा पास केली होती. त्या हायवे ट्राफिक पोलिस, सायबर क्राईम डिव्हिजन आणि पोर्ट झोन येथे DCP पदावर काम करत होत्या. सध्या त्या नागरी संरक्षण विभागात DCP आहेत.
बुली बाई प्रकरण (2022), नायजेरियन जॉब फसवणूक आणि प्रधानमंत्री योजना कर्ज फसवणूक यासारखी अनेक प्रकरणं त्यांनी यशस्वीपणे हाताळली आहेत.
घटस्फोटाची मागणी
पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अटकेनंतर IPS रश्मी करंदीकर यांनी मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांनी पतीने व्यावसायिक माहिती लपवली, असेही सांगितले.
चव्हाण यांना 24 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार, विदेश दौरे, बँक खाती तपासणीखाली आहेत. रश्मी करंदीकर यांचे नाव सध्या FIR मध्ये नसले तरी त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करून निर्णय घेण्यात येईल, असे ईओडब्ल्यूने स्पष्ट केले आहे.