मुंबई : मोठ्या प्रमाणावर विमा प्रकरणांचे दावे निकाली काढले जात आहेत. मात्र, विमा संरक्षण रकमेचा पूर्णतः लाभ विमाधारकांना दिला जात नाही. विशेषतः आरोग्य विम्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत. याबाबत द इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) चिंता व्यक्त केली आहे.
विमा लोकपाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एआरडीएआयचे अध्यक्ष अजय सेठ यांनी आरोग्य विमा दावे निकाली काढण्याच्या पद्धतीवर बोट ठेवले. विमा दावे मोठ्या प्रमाणावर निकाली काढले जात आहेत. काही प्रकरणात पूर्णतः रक्कमही देण्यात येत आहे. काही प्रकरणात अपेक्षेपेक्षा कमी रक्कम दिली जात आहे. विमा संरक्षण रक्कम आणि त्याप्रमाणात दिल्या जाणाऱ्या संरक्षण रकमेतील दरी वाढत आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे सेठ या वेळी म्हणाले.
कोणतेही विमा दावे वेळेवर आणि पारदर्शी पद्धतीने निकाली काढले पाहिजेत. विमा कंपन्यांकडून आमची हीच अपेक्षा आहे. त्यामुळेच विमा क्षेत्रावरील लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. विमा तक्रारींबाबत विमा कंपन्यांची अंतर्गत व्यवस्था मजबूत हवी. प्रत्येक तक्रारीला प्रतिसाद द्यायला हवा. तक्रारींचा आढावा वेळोवेळी घ्यायला हवा. तक्रारींवर योग्य तोडगा काढणे गरजेचे असल्याचे सेठ म्हणाले.
देशातील 3.3 कोटी विमा दावे निकाली, पण
आर्थिक वर्ष 2025मध्ये देशातील 3.3 कोटी आरोग्य विमा दावे निकाली काढण्यात आले असून, त्यापोटी 94 हजार 247 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. विमा दावे निकाली काढत असतानाच विमाधारकांच्या तक्रारीही वाढताना दिसत आहेत. आर्थिक वर्ष 2024मध्ये 53 हजार 230 तक्रारी विमा लोकपालांकडे दाखल झाल्या होत्या. त्यातील 54 टक्के तक्रारी केवळ आरोग्य विम्याच्या आहेत.